पिंपरी : आकुर्डी येथील पक्षाच्या कार्यक्रमात टिकात्मक विधान केल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे आणि भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात जोरदार शाब्दीक चिखलफेक सुरू झाले. दोघांकडून एकमेकांवर आरोपाच्या फैरी झोडल्या जात आहेत. त्यातच आता खासदार बारणे यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना जगतापांनी आव्हान केले आहे. खासदार बारणे यांनी माझ्यावर जेव्हा जेव्हा टिका किंवा आरोप केले, तेव्हा प्रत्येकवेळी विकासावर बोलण्याचे मी त्यांना आव्हान दिले आहे. परंतु, त्यांनी ते कधीच स्वीकारले नाही, अशा शब्दांत जगतापांनी वस्तुस्थिती समोर मांडली आहे.
खासदार बारणे हे विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याऐवजी नळावरची भांडणे करण्यातच धन्यता मानत आहेत. आम्ही विकासावर बोलण्याचे आव्हान दिले की, ते चुप्पी साधतात. वायफळ आरोप करून चर्चेत राहण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करत आहेत. परंतु, फोटावाल्या खासदाराची ही बनवेगिरी शहरातील जनता आता खपवून घेणार नाही. खासदार म्हणून केलेली कामे जनतेला सांगण्यासाठी त्यांच्याकडे मुद्देच नाहीत. दहशतीच्या बळावर प्राधिकरणाच्या जागा ढापणार्यांनी गुन्हेगारीवर बोलणे हास्यास्पद आहे. माझ्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढल्याचे या महाशयांना वाटत असेल, तर त्यांनी खासदार असल्याचे भान ठेवावे. त्यांनी माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार करून दूध का दूध पाणी का पाणी करावे, असे खुले आव्हान भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना दिले आहे.