खासदार, आमदारांच्या प्रयत्नाने सुटला पाणीप्रश्‍न

0
दोन दिवसीय उपोषणानंतर पूजा कॉम्प्लेक्स परीसरातील नागरीकांना न्याय; शेतकरी कामगार पक्षाच्या आंदोलनाने मिळाले पाणी
भुसावळ:- प्रांत कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर आमले यांनी गेल्या काही वर्षांपासून पूजा कॉम्प्लेक्समागील परीसरात नागरीकांना पाणीटंचाई होत असल्यामुळे 20 रोजी आमरण उपोषणाचा ठिय्या विभागीय प्रांत कार्यालयासमोर मांडला होता. शासनाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करूनही तो प्रश्‍न मार्गी लागला नसल्यामुळे ‘उपोषण जैसे थे’ तसेच चालू राहण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष आमले यांनी दिला होता. 22 रोजी खासदार रक्षा खडसे, प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, नगराध्यक्ष रमण भोळे, गटनेते मुन्ना इब्राहिम तेली यांनी उपोषण ठिकाणी भेट देवून प्रश्‍न सोडवले. त्यावेळी नगरपालिकेचे गटनेता मुन्ना इब्राहिम तेली यांनी स्वखर्चाने परीसरातील नागरीकांना ट्युबवेल करून देण्याचे आश्‍वासन दिले होते. आमदार सावकारे व खासदार खडसे यांच्या प्रयत्नाने पूजा कॉम्प्लेक्स परीसरात 24 रोजी ट्युबवेलचे उद्घाटन करण्यात आले.
आश्‍वासनानंतर सोडले उपोषण 
पूजा कॉम्प्लेक्स मागील भागातील नागरीक व शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा संघटक व खडका ग्रा.पं.सदस्य ज्ञानेश्वर आमले हे पाणीटंचाई होती म्हणुन आमरण ऊपोषणाला प्रांत आफीस समोर बसले असतांना खासदार रक्षा खडसे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संवाद करून परीसरातील नागरीकांना 20 लाख रुपये लागणार्‍या पाईपलाईनची मंजुरी घेवून उपोषणकर्त्यांना दोन महिन्यात पाण्याची पाईपलाईन टाकून देण्याचे आश्‍वासन दिले असतांना उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले. यावेळी पालिका गटनेते मुन्ना तेली यांनी परीसरातील नागरीकांना ट्युबवेल करून देतो, असे आश्‍वासन दिले होते. 24 रोजी खासदार व आमदार यांना दिलेल्या आश्‍वासनाची पूजा कॉम्प्लेक्स परीसरात ट्युबवेलचे उद्घाटन करण्यात आले. या भागातील नागरीकानी खासदार रक्षा खडसे, रजनी सावकारे व प्रभारी नगरध्यक्ष युवराज लोणारी यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले होते.