खासदार ए.टी.पाटलांसमोर लोहटारच्या दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

0

पाचोरा – पाचोरा तालुक्यातील लोहटार गावात खा. ए. टी. नाना पाटील यांच्यासह भाजपच्या पदाधिकार्‍यांसमोर भारत शंकर पाटील-राजपूत (वय 32) व त्यांची पत्नी आरती भारत पाटील (वय 22) या दाम्पत्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत स्वतःला पेटवून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

खाजगी मालकीच्या जागेत सरकारी निधीतून विकासकामांचे उद्घाटन केला. या संदर्भात पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार करुनही न्याय न मिळाल्याने पावित्रा घेतल्याचेही भारत पाटील यांनी रुग्णालयात पत्रकारांशी बोलतांना सांगितले. लोहटार हे गाव खासदार ए. टी. पाटील यांनी दत्तक घेतले असून, तेथे आदर्श सांसद पर्यटन विकास योजनेत 1 कोटी 39 लाख रुपये खर्चून रस्ते, गटारी, चतुर्भुज नारायण मंदिराचे सुशोभिकरण व सभामंडप तसेच केंद्रीय पेयजल योजनेतून 3 कोटी 4 लाख खर्चून पाईपलाईन व जलशुद्धीकरण केंद्राचे भूमिपूजन व उद्घाटन शनिवारी (दि.29) करण्यात येणार होते. त्यासाठी खा. ए. टी. पाटील व भाजपचे पदाधिकारी गावात आले होते. त्यांच्यासमोर दाम्पत्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. ग्रामस्थ व नातेवाईकांनी या दाम्पत्याला वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान उपचारार्थ हलवून त्यांचे महसूल व पोलीस प्रशासनाने जबाब नोंदवून घेतले. दोघांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

काय म्हणाले भाजप तालुकाध्यक्ष
याप्रकरणी भाजपाचे तालुकाध्यक्ष सुभाष पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सदरील जमीन माझ्या आजोबांची आहे. या संदर्भातील ग्रामपंचायतीचे उतारे देखील माझ्याकडे आहेत, असा दावा केला.