धुळे : खासदार डॉ.हिना गावीत यांच्या वाहनावर हल्ला प्रकरणी मराठा क्रांती मोर्चाच्या निमंत्रक मनोज मोरेसह 18 आंदोलकांनी शहर पोलीस स्टेशनला बुधवारी सकाळी ११ वाजता स्वतःहून हजर होत आत्मसमर्पण केले. याप्रकरणी चार जणांना आदीच अटक करण्यात आली आहे. त्याना पोलीस कोठडी मिळाली आहे.
रविवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपल्यानंतर खासदार हिना गावीत बाहेर निघत असताना प्रवेशद्वाराजवळच त्यांच्या वाहन अडवून मराठा आंदोलकांनी तोडफोड केली होती. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला होता. मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक अमोल भागवत, अमोल चव्हाण, दिनेश उर्फ ज्ञानेश्वर आटोळे व कुणाल पवार यांना आधीच अटक झाली असून त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यानंतर अॅट्रॉसिटीनुसार दाखल गुन्ह्यात संशयित मराठा क्रांती मोर्चाचे अन्य पदाधिकाऱ्यांवर संशय व्यक्त करण्यात आला होता.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शहर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या अटकेनंतर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहरासह बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे