सलग चौथ्या वर्षी पुरस्कार पटकविला
पिंपरी : लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध विषयांवर संसदेत उपस्थित केलेले प्रश्न, सर्वाधिक चर्चेतील सहभाग संसदेमधील उपस्थिती तसेच स्थानिक खासदार विकास निधीचा संपूर्ण वापर, या अष्टपैलू कामगिरीबद्दल श्रीरंग बारणे यांना चेन्नई येथील पंतप्रधान पाँईंट फौंडेशनच्यावतीने सलग चौथ्या वर्षी ‘संसदरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल, पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल एम.के. नारायणन व माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
खासदाराची संसदेतील कामगिरी त्यांचा विविध चर्चेमधील सहभाग, उपस्थित केलेल्या प्रश्नांची संख्या, खासगी सदस्य विधेयक संख्या, सभागृहातील उपस्थिती यासंदर्भात पी.आर.एस. इंडीयाने दिलेल्या आकडेवारीवरून कामगिरीची आढावा घेऊन लोकसभा सचिवालयामार्फत पुरवलेल्या माहितीवरुन याचे मूल्यांकन निवड समिती मार्फत करण्यात येते. त्यानुसार चेन्नई येथील पंतप्रधान पाँईंट फौंडेशनच्या वतीने ‘संसद रत्न’ हा पुरस्कार दिला जातो.
935 प्रश्न केले उपस्थित
16 व्या लोकसभेच्या गेल्या 4 वर्षातील कामगिरीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये शिवसेनेचे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी 935 प्रश्न उपस्थित केले, 255 वेळा प्रत्यक्ष चर्चेतील सहभाग घेतला, 95 % उपस्थिती दर्शविली. 16 खाजगी विधेयके मांडली त्याचबरोबर विविध समितींच्या बैठकीमध्ये सर्वाधिक उपस्थिती आणि स्थानिक खासदार विकास निधीचा सर्वाधिक वापर करून विविध विकासकामे पूर्णत्वास आणली. या कामगिरीबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांना सलग चौथ्या वर्षी हा पुरस्कार मिळाला.