खासदार रक्षा खडसेंच्या विजयानंतर भुसावळात जल्लोष

0

नाहाटा चौफुलीवर ढोल-ताशांच्या गजरात पदाधिकार्‍यांचे नृत्य ; खासदारांचे केले स्वागत

भुसावळ- संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाल्याने अपेक्षेप्रमाणे पुन्हा मोदींची लाट दिसून आली तर रावेर लोकसभा मतदारसंघात सलग दुसर्‍यांदा खासदार रक्षा खडसे यांनी निवडणुकीत बाजी मारत काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.उल्हास पाटील यांचा पराभव केला. खासदार खडसे यांच्या विजयानंतर भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी नाहाटा चौफुलीवर ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. दरम्यान, भाजपाने मिळवलेल्या विजयानंतर लाडूंसह पेढे भरवून आनंदोत्सवही साजरा करण्यात आला तर भुसावळातील भाजपा व मोदी प्रेमी असलेल्या चहा विक्रेत्याने चहाचे मोफत वाटप करून लक्ष वेधले.

नाहाटा चौफुलीवर भाजपा पदाधिकार्‍यांचा जल्लोष
जामनेर रोडवरील नाहाटा चौफुलीवर भाजपा पदाधिकार्‍यांनी गुलालाची उधळण करीत ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करीत जल्लोष केला. विशेष म्हणजे आमदार संजय सावकारे यांनीही गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांसमवेत जल्लोष केला. याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे आल्यानंतर त्यांचे स्वागत करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. खासदार रक्षा खडसे आगे बढोच्या पदाधिकार्‍यांनी घोषणाही दिल्या. याप्रसंगी उपस्थितांना भाजपाने मिळवलेल्या यशानंतर पेढ्यांचे वाटपही करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, नगरसेवक प्रमोद नेमाडे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, निक्की बत्रा, महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर, प्रा.दिनेश राठी, शिवसेनेचे नगरसेवक मुकेश गुंजाळ, बापू महाजन, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, सतीश सपकाळे, देवा वाणी, दिनेश पाटील, अर्जुन खरारे,, दिनेश नेमाडे, शैलजा पाटील, विनीता नेवे यांच्यासह भाजपा-शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते तर भाजपात नुकताच प्रवेश केलेल्या विजय मोतीराम चौधरी यांनीही दुपारी नाहाटा चौफुलीवर आनंदोत्सव साजरा केला.

भुसावळात मोफत चहांचे वाटप
देशात पुन्हा आलेली मोदी लाट व रावेर लोकसभेत सलग दुसर्‍यांदा विक्रमी मताने खासदार रक्षा खडसे निवडून आल्याने विजयोत्सवानिमित्त संतोषी माता हॉलसमोरील चहा विक्रेते बळीराम राजाराम पवार यांनी रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍यांना थांबवत मोफत चहाचे वाटप केले. याकामी त्यांना टीम भाजपा अटल योजनेचे प्रदेश महामंत्री शिशिर जावळे यांनी सहकार्य केले. दरम्यान, पवार यांनी गत विधानसभा निवडणुकीतही आमदार संजय सावकारे विजयी झाल्याने सुमारे 700 कार्यकर्त्यांना मोफत चहाचे वाटप केले होते तर विद्यमान आमदार सावकारे यांनीही क्षणभर थांबून पवार यांच्याकडील चहाचा आस्वाद घेतला होता हेदेखील तितकेच विशेष !