नगरसेवक श्याम लांडे यांच्या प्रयत्नांना यश
कासारवाडी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथे बांधण्यात येणार्या शाळेच्या इमारतीसाठी राज्यसभा खासदार रेखा गणेशन यांच्या खासदार निधीतून तीन कोटी रुपयांचे आर्थिक साह्य जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाले आहे. आवश्यक कागदपत्रे सादर करून हा निधी घेण्यासंदर्भातील पत्र महापालिका आयुक्तांना प्राप्त झाले आहे. या निधीसाठी माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक श्याम लांडे यांनी पाठपुरावा केला होता.
पाच मजली प्रशस्त शाळा!
कासारवाडी येथील सर्व्हे क्रमांक 420 येथील छत्रपती शाहू महाराज विद्यामंदिराच्या आवारात पाच मजली प्रशस्त शाळा महापालिका बांधणार आहे. या शाळेच्या इमारतीसाठी 13 कोटी 71 लाख 32 हजार 197 रुपये खर्च असून, त्या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. दोन वर्षांत इमारत बांधली जाणार आहे. एकूण भूखंडाचे क्षेत्र 8 हजार 911.30 चौरस मीटर आहे. सद्यःस्थितीत शाळेचे क्षेत्र तीन हजार 789.21 चौरस मीटर आहे. दोन हजार 861.81 चौरस मीटरमध्ये बांधकाम करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निधी वर्ग!
इमारतीसाठी निधी मागण्यासाठी पत्र पाठविण्याची मागणी नगरसेवक लांडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे 8 नोव्हेंबर 2017 ला केली होती. त्याला खासदार रेखा यांनी प्रतिसाद देत जानेवारी 2018 ला जिल्हा नियोजन समितीकडे पत्र पाठवून निधी वर्ग करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार तीन कोटींचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नुकताच वर्ग झाला आहे. सदर निधी महापालिकेने घ्यावा, असे पत्र जिल्हाधिकार्यांनी 24 जानेवारीला आयुक्त हर्डीकर यांना पाठविले आहे, अशी माहिती नगरसेवक श्याम लांडे यांनी दिली.