पुणे : भारतीय जनता पक्षाचे खासदार अनिल शिरोळे यांनी शनिवारी संध्याकाळी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित केला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा मिलन कार्यक्रम चर्चेचा विषय झाला. स्नेहमिलन कार्यक्रम शिरोळे नेहमीच आयोजित करतात. त्याप्रमाणे त्यांनी सर्वपक्षीयांना निमंत्रण दिले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोजक्या नेत्यांनी हजेरी लावली होती. पण काँग्रेस पक्षाने मात्र पाठ फिरविली. भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिरोळे यांनी कार्यक्रमाला पक्षीय स्वरूप दिले नव्हते. व्यासपीठावर पाच वर्षातील ठळक कार्यक्रमाचा तपशील असणारा फलक लावला होता. त्यातही पुरंदर विमानतळ उभारणी आणि मेट्रोची प्रगती या कामगिरीचा उल्लेख ठळक होता. मसाले भात, अळूची भाजी आणि जिलबी असा जेवणाचा टिपीकल पुणेरी बेत होता. भाजपमध्ये उमेदवारीसाठी शिरोळे यांच्या व्यतिरिक्त गिरीश बापट, योगेश गोगावले इच्छुक आहेत. पक्षांतर्गत स्पर्धेमुळे स्नेह मिलन कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित होते याची चर्चा झाली.