खासदार सुप्रिया सुळे यांनी केली वाहतुकीची पाहणी

0
हिंजवडी:राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी रस्त्यावर उतरुन हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीची पाहणी केली. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. तसेच एकेरी वाहतूक सुरु केल्यामुळे वाहने एका जागेवर थांबून राहत नाहीत, याबाबत देखील त्यांनी समाधान व्यक्त केले. हिंजवडी ग्रामंपचायात कार्यालयात आज सकाळी साडेआठ वाजता खासदार सुळे यांनी पीएमआरडीए, एमआयडीसी, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, हिंजवडी ग्रामस्थ, हिंजवडी असोसिएशन यांची संयुक्त बैठक घेतली. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना त्यांनी विविध सूचना दिल्या. बैठकीला हिंजवडीच्या सरपंच दीपाली साखरे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, पिंपरी पालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे, पुण्याचे नगरसेवक सचिन दोडके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, माजी संरपच श्यामराव हुलावळे, दत्ता साखरे, सागर साखरे यांच्यासह फ्री-अप हिंजवडीचे सुधीर देशमुख, सचिन लोंढे उपस्थित होते.
सविस्तर अहवाल सादर करावा
हिंजवडी परिसरातील रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत. माणचा एमआयडीसीला जोडणारा 100 मीटरचा रस्ता त्वरित दुरुस्त करावा. पीएमआरडीए, एमआयडीसीने हिंजवडीतील शेतकर्‍यांना योग्य मोबदला देऊन जागा ताब्यात घ्याव्यात. प्रलंबित रस्ते विकसित करावेत. त्यामुळे शिवाजी वाकड रस्त्यावरील वाहनांचा ताण कमी होईल. परिणामी, वाहतूक कोंडी देखील कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. एमआयडीसीने रस्त्यांवरील अतिक्रमणावर कारवाई केल्यामुळे रस्ता मोकळा झाला आहे. यापुढे देखील रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना खासदार सुळे यांनी दिल्या आहेत. पीएमआरडीए, एमआयडीसी, पोलिसांनी वाहतूक कोडींचा अभ्यास करावा. त्यातील अडीअडचणी जाणून घेऊन आठ दिवसात दीर्घकालीन उपाययोजनांसाठी सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.