खा. अनिल शिरोळे यांचे राजकीय वजन वाढले

0

पुणे । लोकपाल नियुक्तीसह अन्य मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी आंदोलनासंदर्भात बोलणी करण्याची जबाबदारी भाजपने खासदार अनिल शिरोळे यांच्यावर सोपविली आहे. ही महत्त्वाची जबाबदारी आल्यानंतर त्यादृष्टीने हालचाली करण्यास त्यांनी सुरुवात केल्यामुळे पक्षामध्ये शिरोळे यांचे राजकीय वजन वाढले आहे.लोकपाल नियुक्तीसह अन्य मागण्यांसाठी दिल्लीमध्ये आंदोलन करण्याचा इशारा अण्णांनी दिला आहे. आंदोलन यशस्वी होण्यासाठी स्वयंसेवकांची निवड अण्णांनी सुरू केली आहे, त्याला प्रतिसादही मिळत आहे. सध्या मोदी सरकार मोठ्या कोंडीत सापडले आहे. आर्थिक धोरणाच्या विरोधात काँग्रेसने मोदी सरकारवर टीकेचा भडीमार चालविला आहे. अशातच अण्णांचे आंदोलन सुरू झाल्यास सरकारपुढे अडचणी आणखी वाढतील. हे ओळखून भाजपने अण्णांशी बोलणी करण्याचे धोरण स्वीकारले आहे.

याचा परिणाम पुण्यातील राजकारणावर
यासाठी मुख्यमंत्री फडणवीस सक्रीय झाले आहेत. अण्णांशी प्राथमिक बोलणी करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी शिरोळे यांच्यावर सोपविली. त्याप्रमाणे शिरोळे यांनी अण्णांची भेटही घेतली. सार्वजनिक जीवनात शिरोळे यांची आजवरची प्रतिमा स्वच्छ आहे, त्यामुळे त्यांची निवड करण्यात आली, असे मानले जाते. पंतप्रधान कार्यालयाचा विश्‍वासही शिरोळे यांनी वेगवेगळ्या विकासकामांद्वारे संपादिला आहे. परंतु राजकीय जबाबदारी देऊन पक्षानेही शिरोळे यांच्यावर भरवसा ठेवला आहे. याचा परिणाम पुण्यातील राजकारणावरही होईल.