खा. काकडेंची अचानक ‘खामोशी‘ का?

0

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत अगदी आघाडीवर असलेले खासदार संजय काकडे अलीकडे भारतीय जनता पक्षात एकदम गप्प का झाले? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू झाली आहे. खा. काकडे यांच्याविरोधात एक मोठा गट सक्रीय झाला असून, त्यामुळे काकडे यांची राजकीय गोची करण्यासाठी हा गट सर्वच पातळीवर कामाला लागला असल्याची बाबही निदर्शनास येत आहेत.

बैठका, मंत्र्यांच्या दौर्‍यांतही खा. काकडे गायब
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यातील खा. काकडे हे ताईत आहेत, असे बोलले जात होते. महापालिका निवडणुकीत भाजपच्या पोस्टरवर खा. काकडे यांना स्थान देण्यात आले होते. नेत्यांच्या पत्रकार परिषदेला या अपक्ष खासदाराला भाजपकडून मानाचे स्थान दिले जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी खा. काकडे यांनी मिरवणूक काढली, त्यात भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांच्यासह कार्यकर्ते सामील झाले होते. महापालिका निवडणुकीत भाजपला 90 हून अधिक जागा मिळतील अशी पैज काकडे यांनी लावली आणि ती सर्वत्र गाजली होती. भाजपला अनेक उमेदवार त्यांनीच मिळवून दिले. अलीकडे मात्र खा. काकडे पुण्याच्या किंवा भाजपच्या राजकारणात ठळकपणे दिसेनासे झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा वाढविण्याची जबाबदारी आपण घेतल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर पुण्याच्या प्रश्नात भाजपच्या बैठका झाल्या, मंत्र्यांचे दौरे होऊन गेले पण काकडे कुठे दिसेतनाच म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली.

न्यू कोपरेचे प्रकरण शेकणार का?
दरम्यान, न्यू कोपरे येथील प्रकल्पातील रहिवाशांचा पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित झाला आणि काकडे यांच्याविरोधात माजी आमदार कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनही उभे राहिले आहे. मित्रमंडळ येथील जागेच्या वादातही काकडे यांच्या परिवाराचे नाव घेतले गेले. महापालिका पदाधिकारी निवडीतही काकडे यांच्या समर्थकांची सरशी झालेली नाही. भाजप हा एका शिस्तीत चालणारा पक्ष आहे अशी जाणीव एका नेत्याने नानांना म्हणजे संजय काकडे यांना दिली अशी चर्चा भाजप वर्तुळात आहे. पुण्यातील भाजपमध्ये अनिल शिरोळे, प्रकाश जावडेकर, गिरीश बापट, योगेश गोगावले असे प्रमुख नेते आहेत, त्यात अपक्ष राहून खा. काकडे शिरकाव कसा करणार हाही कळीचा मुद्दा आहे. पुण्याच्या राजकारणात नव नवे पेच निर्माण होत असतात, ते कौशल्याने सोडवावे लागतात. त्यात भाजपसारख्या केडरबेस पक्षात तर अधिक सतर्क असावे लागते. त्यामुळे काकडे यांचेही कौशल्य आगामी काळातही पणाला लागणार आहे.