खा. काकडेंची भूमिका भाजपला मान्य आहे का? शिवसृष्टी न झाल्यास मेट्रो अडविण्याचा राष्ट्रवादीचा इशारा
पुणे : शिवसृष्टीबाबत खासदार संजय काकडे यांनी सुचविलेल्या तोडग्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र काकडे यांचा तोडगा म्हणजे भाजपची अधिकृत भूमिका आहे का? याचे स्पष्टीकरण झालेले नाही. शिवसृष्टी न झाल्यास मेट्रो अडवू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांनी दिल्यावर काकडे यांची पत्रकबाजी झाल्याने राजकीय रंगही आला आहे.
राष्ट्रवादीकडून भाजपची कोंडी
कोथरूड कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी उभी करण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली आहे. याच ठिकाणी मेट्रो स्टेशन व्हावे असाही प्रस्ताव आहे. तरीही शिवसृष्टीबद्दल कोथरूडमधील लोकप्रतिनिधी अनुकूल आहेत. मध्यंतरी मुख्यमंत्री दालनातही बैठक झाली, पुन्हा बैठक घेण्याचे ठरले. दोन महिने उलटूनही बैठकीसाठी हालचाल झाली नाही. त्यानंतर मानकर यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना पत्र पाठवून विचारणा केली. शिवसृष्टीबद्दल चालढकल केल्यास मेट्रोचे काम होऊ देणार नाही असा इशारा मानकर यांनी नुकताच दिला. त्या पाठोपाठ काकडे यांचे पत्रक प्रसिध्द झाले. कचरा डेपोच्या जागी मेट्रो स्टेशन व्हावे आणि जैववैविध्य आरक्षित (बीडीपी) जागेवर शिवसृष्टी व्हावी असा तोडगा काकडे यांनी सुचविला आहे. भाजपच्या एका नेत्याला याबाबत विचारले असता काकडे आमचे नेते आहेत; पण त्यांच्या पत्रकाबाबत माहिती घेत आहोत असे उत्तर देण्यात आले.
तुपेंचे खासदार काकडेंवर टीकास्त्र
पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी खासदार काकडे यांच्यावर टीकास्त्र सोडले. बीडीपी जागेत पक्के बांधकाम होऊ शकत नाही मग शिवसृष्टी कशी उभी करणार? या आरक्षणाची खासदार असून काकडे यांना माहिती नसावी याचे आश्चर्य वाटते असे तुपे म्हणाले. भाजपला शिवसृष्टीच करायची नाही म्हणून ते वेगवेगळे मुद्दे काढून मूळ विषयाला बगल देत आहेत, असाही आरोप तुपे यांनी केला. काकडे यांच्या तोडग्या वरून भाजपमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. यात पालकमंत्री बापट कोणती भूमिका घेतात, कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरली मोहोळ यांची मतेही महत्वाची राहाणार आहेत. काकडे यांच्या तोडगा सुचविणे हे वैयक्तिक आहे की यामागे भाजपची काही चाल आहे हेही अजून स्पष्ट झालेले नाही.