खा.हिना गावितांची कामे अनभिज्ञच

0

नंदुरबार । लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.हिना गावित यांनी आपल्या चार वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणांवर विविध विकासकामे केल्याचा आणि त्यासाठी भरमसाठ निधी मिळवून दिल्याचा दावा केला आहे. परंतु हा लेखाजोगा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचला का ? त्यासाठी काही उपक्रम राबविले का ? याचे उत्तर नाही असेच राहणार आहे. नंदुरबार लोकसभा मतदार संघात अनेक कामे झाले असले तरी त्यांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यात खा.हिना गावीत व त्यांची यंत्रणा अपयशी ठरली आहे.

पक्षातर्फे ठोस असा एकही उपक्रम नाही
सर्वात जास्त खासदार निधी खर्च करण्यात खा.हिना गावीत यांनी बाजी मारली आहे. त्यातून कार्यक्षम खासदार म्हणून त्यांचा उल्लेख केला जावू शकतो. परंतु याची प्रसिद्धी देण्यात कुचराई करण्यात येत आहे. त्यांच्याच पाठपुराव्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदार संघातील अनेक महत्वाच्या रस्त्यांना शंभर कोटीहून अधिकच निधी मिळाला आहे. पण त्याचाही वाजागाजा करण्यात आला नाही.केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने अनेक ठिकाणी कार्यक्रम घेवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मात्र नंदुरबार जिल्ह्यात भाजपाच्या वतीने असा कोणताही उपक्रम राबविण्यात आल्याचे ऐकीवात नाही. याची कुरबुर सुरू झाल्याने खा.हिना गावीत यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेवून चार वर्षाचा लेखाजोगा मांडला. त्यातही काही माहितीचा अभाव दिसून आला.

विकासकामात प्रभाव मात्र जनतेत अभाव
एकंदरीतच खा.हिना गावीत यांनी आपल्या नंदुरबार मतदार संघात प्रभावीपणे कामे केले आहेत, यात दुमत नाही, परंतु ते जनतेपर्यंत पोहचविण्यात आली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. खा.हिना गावीत यांच्याचकडे भाजपाचे जिल्हाध्यक्षपद असल्याने त्यांच्या सुचनांशिवाय इतर पदाधिकारी कोणताही कार्यक्रम, उपक्रम राबवू शकत नाही. काँग्रेसचे टॉपटेन खासदार माणिकराव गावीत यांचा पराभव करून हिना गावीत ह्या खासदार बनल्या आहेत. त्यामुळे मोदींच्या दरबारात त्यांच वजन आहेत. याचा पुरेपूर फायदा त्यांनी आपल्या मतदार संघासाठी केल्याचा प्रयत्न दिसतोय. मात्र त्यावर अंधाराचे जाळे पसरले आहे, ते साफ करणे गरजेचे झाले आहे.

पंतप्रधान मोदींच्या सुचनांचा अव्हेर
आपण केलेल्या कामांची माहिती मतदार संघातील नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा स्पष्ट सुचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खासदारांना दिल्या आहेत. असे असले तरी नरेंद्र मोदी यांच्या सुचनांचे पालन या मतदार संघात त्यामुळे आपल्या खासदारांनी चार वर्षात काय कामे केलीत ? त्यासाठी किती निधी आणला ? केंद्राच्या कोणत्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यात आल्या. या गोष्टीपासून मतदार संघातील नागरिक अनभिज्ञच आहेत. असेच म्हणावे लागेल. या गोष्टीला अनेक बाबी कारणीभूत आहेत. वारंवार पक्षांतर्गत उफाळून येणारा वाद, योजनांच्या व कामांच्या श्रेयासाठी भाजपच्याच लोकप्रतिनिधींमध्ये सुरू असलेला कलगीतुरा, ओरीजनलं भाजप आणि डुप्लीकेट भाजप म्हणून वारंवार होत असलेला शब्दांचा वार, सोशल मीडियाचा अभाव यासारख्या असंख्य गोष्टींमुळे खा.हिना गावीत यांच्या कामांचा किताब झाकला जात आहे.