खिर्डी : खिर्डीसह परीसरातील वाघाडी, रेंभोटा, भामलवाडी, पुरी गोलवाडा यांसारख्या सहा ते आठ खेडे परीसरातील जि.प मराठी शाळा ओस पडलेल्या अवस्थेत आहेत. विद्यार्थी संख्या अवघ्या पाच टक्क्यांवर आली असून पालकवर्ग जवळ असलेल्या सावदा, रावेर, फैजपूर या शहरी भागात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठवत असल्याने स्थानिक पातळीवरील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. एकीकडे राज्य शासन मराठी संवर्धनासाठी नव-नवीन धोरणे प्रकल्प आखत आहे मात्र बालभारतीच्या व राज्यातील जि.प.मराठी शाळांकडे कोणतेही शैक्षणिकदृष्ट्या विकासात्मक धोरण आखत नसल्यामुळे जि.प.शाळांवर ही वेळ येत असल्याचा आरोप होत आहे.
तर मिळेल मराठी शाळांना गतवैभव
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दुकानावरील मराठी पाट्या सक्तीचे करण्याबरोबर मराठी शाळा ही सक्तीने गावा-गावात सक्तीने सुरू कराव्यात व पालकवर्गानेही आपल्या पाल्यांना स्थानिक स्तरावर शिक्षणासाठी पाठवल्यास मराठी शाळांना गतवैभव मिळाल्याशिवाय राहणार आहे.