खिर्डी : शेतकर्याच्या खळ्यातून चोरट्यांनी नुकत्याच दोन म्हशी चोरून नेल्याची बाब उघडकीस आल्याने पशूपालकांमध्ये भीती पसरली आहे. खिर्डी खुर्द येथील रहिवासी रमेश वामन पाटील (59) यांनी या प्रकरणी निंभोरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिला आहे. परीसरात शेतकर्यांकडील म्हशींची ही गेल्या तीन महिन्यातील तिसरी चोरी घटना असल्याने पोलिस प्रशासनाने तातडीने चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची अपेक्षा आहे. खिर्डी खुर्द येथील शेतकरी रमेश पाटील यांचा म्हशीचा वाडा हा गावाबाहेर निंभोरा रोडवर असून चोरट्यांनी त्या वाड्याच्या मागील बाजूने शेतातून येवून प्रवेश करीत म्हशी लांबवल्या.
पधूधन चोरीमुळे शेतकरी संकटात
गेल्या काही दिवसांपूर्वी भामलवाडी येथील शेतकरी ईश्वर ज्ञानेश्वर पाटील तसेच गुलाब मिठाराम पाटील या दोन्ही शेतकर्यांडील म्हशी चोरीला गेल्या तर त्यानंतर चोरट्यांनी आता खिर्डीकडे मोर्चा वळवून शेतकरी रमेश पाटील यांच्या दोन म्हशी लांबवल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, पशूधन चोरट्यांची मोठी टोळी सक्रिय झाल्याची चर्चा असून निंभोरा पोलिसांनी या परीसरात गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.