खिर्णीपुर्‍यात आगीमुळे घर खाक : कुटुंब उघड्यावर

यावल : शहरातील खिर्णीपुरा या मध्यवर्ती भागात अचानक एका घराला आग लागून संपूर्ण घर जळून खाक होवून या घरातील चौघांना परीसरातील तरुणांनी शिताफीने वाचवले. आगीमुळे सुमारे पाच लाखांपर्यंतचे नुकसान झाले. केवळ अंगावरच्या कपड्यावरचा संपूर्ण कुटुंब हे उघड्यावर आले असून तरुणांनी पुढाकार घेऊन आग रोखली अन्यथा संपूर्ण परीसराला आगीने वेढा घातला असता.

शॉर्ट सर्किटमुळे लागली आग
शहरातील बुरूज चौकाच्या पुढे मध्यवस्तीत खिर्णीपुरा परिसर आहे. येथील रहिवासी शेख चांद शेख कालू व त्यांचा मुलगा शेख भिकारी शेख चांद हे फळ, फ्रुट विक्री करून उदरनिर्वाह करतात. गुरुवारी सायंकाळी व्यवसाय करून ते घरी परतले होते व मुस्लिम समाज बांधवांची मोठी पवित्र रात्र शब -ए- मेराज असल्याने कुटुंबातील सदस्य नमाज अदा करण्यासाठी गेले होते तर घरात महिला आणि दोन लहान बालक होती. सायंकाळी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. तीन खोल्यांच्या या घरात पुढील खोलीस आग लागल्याने लवकर निदर्शनास आले नाही व अचानक आगीने रौद्र रूप धारण केले पुढील व मधल्या खोलीला आग लागल्यामुळे कुटुंबातील नुरजहाँ बी, सबनूर बी व दोन लहान बालके असे चौघे जण घरातच अडकले. या भागातील शेख इमरान शेख बिस्मिल्ला, याकुब गुलाम अहमद व इलियास खान आदींनी घरातील चौघांना एका बाजूची भिंत तोडून सुखरूप बाहेर काढले तर आगीने इतकं प्रचंड रूप धारण केलं होतं की यामध्ये घरातील फॅन, कपाट, सोफासेट, फ्रीज, अंथरूण-पांघरूण, अन्नधान्य असा संपूर्ण सुमारे पाच लाखांचा ऐवज हा जळून खाक झाला. यात कपाटामध्ये व्यवहार व दैनंदिनी खरेदी-विक्रीसाठी ठेवलेले 35 हजार 700 रुपयांची रोकडदेखील जळून खाक झाली. अंगावरचे तेव्हढे कपडे या कुटुंबीयांचे उरले तर खिर्णीपुरा भागातील तरुणांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आग तातडीने विझवत ती इतर घरांपर्यंत जाण्यास रोखली अन्यथा परीसरात आग लागून फार मोठी जीवीतहानीदेखील झाली असती.

तातडीने घेतली धाव
आगीचे वृत्त कळताच परीसरातील नगरसेवक गुलाम रसूल गुलाम दस्तगीर, सैय्यद युनूस सैय्यद युसूफ, इकबाल खान नसीर खान, सईद शाह, भुराभाई शाह आदींनी त्या ठिकाणी जाऊन मदतकार्य केले व रात्री सदर कुटुंबीयांना दुसर्‍या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करून त्यांना दिलासा दिला मात्र संपूर्ण घर जळून खाक झाल्यामुळे हे कुटुंब अंगावरच्या कपड्यावरचं उघड्यावर आले आहे.