साक्री । तालुक्यातील खुडाणे येथे शेतीच्या हिस्से वाटणीच्या वादातून कैलास रामा हिरे याच्यांवर जिवघेणा हल्ला करीत जाळून मारण्याचा प्रयत्न केला गेला. याप्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी तसेच आरोपींमध्ये आणखी दोघांचा समावेश केला जावा, अशी मागणी करीत आज कैलास हिरे यांच्या कुटुंबियांसह शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्यासह शिवसैनिकांनी पोलिस अधिक्षकांची भेट घेत निवेदन दिले. खुडाणे ता.साक्री येथे दि. 14 डिसेंबर रोजी कैलास रामा हिरे यांच्या हिश्याची शेतजमिन त्यांचे पुतण्यानी परस्पर विकण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यास विरोध करीत स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर लोखंडी रॉडने मारहाण करीत अंगावर रॉकेल टाकून जाळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला.
दहा दिवसानंतरही अटक नाही
याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात धनराज गुलाब हिरे, विजू गुलाब हिरे, सुदाम बारकू हिरे, सोन्या बारकू हिरे आणि उषाबाई गुलाब हिरे, विमलबाई बारकू हिरे सर्व रा. खुडाणे ता.साक्री यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र दहा दिवस उलटत आले तरी अद्याप कोणालाही अटक केली गेलेली नाही. त्यांना लवकर अटक होत नसल्याचे त्यांची हिम्मत वाढत आहे. ते पुन्हा अशाच प्रकारे हल्ला करण्याची भिती कैलास हिरे यांच्या परिवाराला आहे.
यांची होती उपस्थिती
गुलाब रामा हिरे आणि बारकू रामा हिरे यांची देखील नावे फिर्यादीने जबाबात सांगितलेली आहे. त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. निवेदन देतांना शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी, जि.प सदस्य धनराज गायकवाड, वारचे सरपंच दिनेश गिरासे, लिलाबाई वारुडे, सुनंदाबाई हिरे, चुडामण वारुडे, नथ्थू माळी, उपसरपंच निंबा अहिरे, कमलेश बोरसे, समाधान गिरासे, दिपक पाटील, रविंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.