भुसावळ। तालुक्यातील निंभोरा येथील सरपंच शालीक सोनवणे यांची हत्या 19 रोजी झाली होती. याअगोदर सोनवणे हे चार दिवस बेपत्ता होते. मात्र पोलीस यंत्रणा ढिम्मपणे बसली होती. सोनवणे यांचा तपास लवकर लागला असता तर सोनवणे यांचे प्राण वाचू शकले असते. मात्र खुन्यांचा शोध लावण्यात पोलीसांना अद्याप तरी अपयश आल्याचे दिसून येत आहे. पाच दिवसापूर्वी निंभोरा सरपंच सोनवणे यांची हत्या झाली होती. सोनवणे यांनी गावातील सत्ताधार्यांना मागे सारुन आपली सत्ता स्थापन केली. त्यानंतर उपसरपंच पदासाठी प्रत्येक वर्षी उपसरपंच बदलण्याचा सुध्दा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयात अडसर म्हणून उपसरपंच यांनी राजीनामा न दिल्याने ग्रामपंचायती गोंधळ झाला होता.
कामांना मिळाली होती गती
शहरातील रस्ते, गटारी, पथदिवे यांची नियमितपणे कामे झाल्यामुळे विरोधकांच्या नाचक्की झाल्यामुळे गावाच्या विकासाला गती लागली होती. आताच शासनाने दिपनगर पॉवर हाऊसजवळ नवी वीज निर्मिती केंद्राची घोषणा करण्यात आली होती तसेच गावाला लागूनच चारपदरी महामार्गाची सुध्दा रुपरेषा आखण्यात आली असून नियमित ग्रामपंचायतीमध्ये गावाच्या विकासासंदर्भात विविध योजनांना दुजोरा देत काम सुरु होते.
संभ्रमावस्था कायम
19 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास शालिक सोनवणे यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह फेकरी टोलनाक्याच्यापुढे रेल्वे उड्डाणपुलाखाली आढळून आला होता. मृतदेहाची माहिती कळताच गावकरी शहानिशा करण्यासाठी उड्डाणपुलाखाली आले असता हे शालिक सोनवणेच आहे याची खात्री पटताच गावकर्यांनी महामार्ग ठप्प केला होता. तब्बल चार तास महामार्ग जाम केल्यामुळे शासनाची यंत्रणा ठप्प पडली होती. मात्र आपल्या अंगावरुन बोज हटविण्यासाठी पोलीस यंत्रणेने गावकर्यांची मनधरणी करुन रास्ता रोको आंदोलन थांबवून महामार्गावर असलेल्या वाहतुकीला सुरळीतपणे मार्ग मोकळा केला. मात्र चार दिवस उलटल्यानंतरही अजूनही सरपंचांचा खुनाबाबत कोणतीही प्रगती न झाल्याचे दिसून येत आहे
घटनेचा सुगावा लागेना
गेल्या तीन महिन्यांपासून उपसरपंच पदाला उतरण्यावरुन ग्रामपंचायतीमध्ये मोठा गदारोळ सुरु झाला. काही दिवसाने तो वाद निवळून शांतता झाल्याने 15 रोजी सरपंच शालिक सोनवणे यांची बेपत्ता होण्याची नोंद तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. चार दिवसानंतर शालिक सोनवणेंचा मृतदेह फेकरी उड्डाणपुलाखाली आढळून आला असून गावकर्यांनी तीव्र संताप करुन महामार्ग ठप्प केला होता. ग्रामपंचायतीच्या 16 सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेवूनही चौकशी करुनही आजपर्यंत सरपंचांच्या खुनाचा शोध पोलिसांना मिळाला नाही.