खुनातील कुविख्यात राज चव्हाण पोलिसांच्या जाळ्यात

0

अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या कारवाईला यश

अमळनेर (प्रतिनिधी)- शहरातील कुविख्यात अट्टल घरफोड्या व प्राणघातक हल्ला करणारा कुख्यात गुन्हेगार राज वसंत चव्हाण व त्याची साथीदार रबिया दुलेखां पटवा यांना वाशीम जिल्यातील कारंजा शरातील तुळजाभवानी नगर झोपडपट्टी परिसरातून बुधवारी मध्यरात्री अमळनेर पोलिसांनी कारंजा शहर पोलिसांच्या मदतीने सिनेस्टाईलने ताब्यात घेण्यात आले. प्रा.दीपक पाटील खूनप्रकरणी गेल्या अडीच महिन्यापासून फरार असलेल्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. अमळनेर शहरातील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचे प्रा.दीपक देवराम पाटील यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना 4 मार्च रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली होती. दीपक देवराम पाटील हे 4 रोजी पहाटे डॉ. हजारे अक्सिडंट हॉस्पिटलच्या बाहेर मृतावस्थेत पडलेले आढळून आल्यानंतर पोलिसांनी रात्री त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या डोक्यावर, पाठीवर, पायांवर मार लागलेला होता. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दीपक पाटील खून प्रकरणात दिरंगाई केल्यामुळे अमळनेरचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांची तडकाफडकी बदली झाली होती. त्यात मुख्य कुख्यात आरोपी राज वसंत चव्हाण व त्याची साथीदार राबिया दिलेखा पटवा हे पसार झाल्याचे निष्षन्न झाले होते.

बाबा बोहरी प्रकरणातील संशयीत आरोपी ?
अमळनेर शहरात राजने एक टोळीही तयार केली आहे. यातून ते शहरात घरफोड्या, करत असत. त्यांनी स्वामी विवेकानंद नगरात अरुण पुंडलिक पाटील यांच्या घरात घुसून धाडसी चोरी केली होती. दीड वर्षांपूर्वी हॉटेल रुपालीचे मालक कांतीलाल हेमनदास सैनानी यांच्यावर पिस्तुल लावत डोक्यात कुर्हाडीचा घाव घालून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. पुन्हा या दोघांनी पालिका समोरील पान दुकानदार गणेश संतोष पाटील (रा.पैलाड) यांना पिस्तुल लावून त्यांच्या पायावर लोखंडी रॉडने प्रहार केला व त्याच्याकडून जीवे ठार मारण्याची धमकी देत दोन हजार 80 रुपये रोख रक्कम व सॅमसंग मोबाईल काढून घेतला. त्यावेळी त्याला तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी रंगेहात पिस्तुलसह पकडले होते. त्यानंतर जामिनावर सुटलेल्या राज चव्हाण याने पुन्हा अमळनेर शहरात धुमाकूळ घातला होता व त्याने पुढे प्रा दीपक पाटील यांचा खून करून एच.डी.एफ.सी.शिरपूर पीपल्स को ऑप बँक व आयडीबीआय या तीन बँकांचे एटीएम चेक केले होते मात्र फक्त पाठक प्लाझा येथील आयडीबीआय बँकेच्या एटीएम मधून 50 हजार रुपये मिळाले. त्याचे फुटेज मात्र शिरपूर पीपल्सच्या एटीएममध्ये आढळून आले त्यावरून त्याची ओळख पटली होती. या दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, चाळीसगांव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोकुळ पाटील किशोर पाटील, सुनील पाटील, प्रमोद बागडे व त्यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीवर अपर पोलीस अधीक्षक बच्छाव यांनी पकडणार्‍याास 15 हजारांचे बक्षीस जाहीर केले होते.

संयुक्त कारवाईत यश
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा आणि अमळनेर पोलीस पथक असे दोन्ही पथक हे मिळालेल्या माहितीवरून रवाना झाले होते. यात पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव व वाशीम जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी मार्गदर्शन करत पथक गेले होते. कारंजा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोतीराम बोडके यांच्या पथकातील कारंजा येथे मदत करणारे पोलीस निरीक्षक मोतीराम बोडके, पोलीस कॉन्टेबल अश्विन जाधव, देवानंद कुरुतवाड, फिरोज खान, मोहम्मद महीला पोलीस चित्रा खंडारे यांनीही त्याला पकडण्यात मोलाची मदत केली. आरोपी अमनेरातील बाबा बोहरी प्रकरणातही संशयीत आरोपी असू शकतो? अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली.

कुख्यात गुन्हेगार राज वसंत चव्हाणवर डझनभर गंभीर गुन्हे
अमळनेर पोलीस ठाण्यात आरोपी राज चव्हाणविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. फिर्यादी किन्नर मेहंदीजान तमन्नाजान यांच्याकडून एक लाख रुपये महिना हप्ता (खंडणी) मागायचा आणि दिले नाही म्हणून मारहाण केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होता शिवाय शेगांव येथे शेतात इसम पराग मनोहर घरोटे (29, वर्ष रा. बिडकरले आउट, तुकडोजी वार्ड, हिंगणघाट, जि.वर्धा) यास पाच जणांनी मिळून मयताच्या खिशातून स्टेट बँकेच्या एटीएम कार्ड चा पासवर्ड सांगितला नाही म्हणून लाकडाच्या दांड्याने व पट्ट्याने लाथा-बुक्यांनी मारहाण, दुखापत करीत जिवे ठार केले. त्यात आरोपी राज चव्हाण सहभागी होता. त्याच्याविरुद्ध शेगांव शहर पोलिसात 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होताता. शिवाय त्याच्याविरुद्ध कोर्टात दोषारोपत्र दाखल होता. आरोपीविरुद्ध मध्यप्रदेश हरदा जिल्ह्यातील खिडकिया पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल आहे. मयत प्रा.दीपक पाटील यांच्या खुनाच्या 302 गुन्ह्यात राज चव्हाणसह राबियाला अटक करण्यात आली तर तपास अनिल बडगुजर हे करीत आहे. पुढील तपासात अनेक संशयीत गुन्हेगार हाती लागण्याची शक्यता आहे. आरोपी प्रशांत हा वाशीम जिल्यातील कारंजा शहरातील तुळजा भवानी नगर झोपडपट्टी परीसरात असल्याची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी कारवाईची सूचना केल्यानंतर आरोपींच्या अटकेची कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यात गण्या उर्फ विजय मेढे (बदलापूर, मुंबई) याचा सहभाग असल्याची शक्यता असून तो पसार झाला आहे. काही संशयीत आरोपी अटक होण्याची शक्यता अपर अधीक्षक बच्छाव यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना व्यक्त केली.