खुनाने उत्राण हादरले : लहान भावाचा डोक्यात मुसळी टाकून केला खून
आरोपीला कासोदा पोलिसांकडून अटक : हत्या करीत मृतदेह फेकला गिरणा पात्रात
Murder Shook Utran : The Younger Brother Was Killed By Putting A Pestle On His Head एरंडोल : वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाची डोक्यात मुसळी टाकून हत्या केली व पुरावा मिटवण्यासाठी मृतदेहदेखील गिरणा पात्रात फेकला मात्र मयताची ओळख पटताच खुनाचा उलगडा झाला. तालुक्यातील उत्राण येथे ही घटना घडली. या घटनेत सत्यवान धोंडू महाजन (55) यांचा खून झाला तर संशयीत आरोपी भगवान धोंडू महाजन (62) यास अटक करण्यात आली.
मालमत्तेवरून भावाचा केला खून
एरंडोल तालुक्यातील भातखंडेच्या जवळ गिरणा नदीपात्रात एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर हा मृतदेह सत्यवान धोंडू महाजन यांचा असल्याची ओळख पटली. पोलिसात तपासात अनोळखीचा खून झाल्याचे स्पष्ट होताच तपासचक्रे फिरली. मयत हा भगवान महाजन असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी खुनाचा उलगडा केला. सत्यवान महाजन यांचा खून त्यांचाच मोठा भाऊ भगवान धोंडू महाजन याने वडिलोपार्जित घराच्या वादातून भावाचा डोक्यात मुसळी टाकून खून केल्याची कबुली दिली.
गोणपाटात टाकून फेकला मृतदेह
सोमवार, 12 सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता सत्यवान महाजन यांनी घरातील मोरीत लघुशंका केल्यावरून दोघांमध्ये झालेल्या वादातून संतापलेल्या भगवान याने डोक्यात मुसळी चार ते पाच वेळेस मारल्याने सत्यवान महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर भगवानने घरातील पलंगाखाली मृतदेह लपवून ठेवला. तसेच मयताचे पडलेले रक्त कापडाने व गोणपाटाने पुसुन टाकले. यानंतर रात्री उशीरा त्याने पोत्यातून सायकलवरुन नेत मृतदेह नेर गिरणा नदीपात्रात फेकून दिला. या घटनेनंतर भगवान गायब झाला. शेवटी उत्राणच्या पोलिस पाटलांनी पोलिसांच्या मदतीने एरंडोल स्थानकावरून भगवान महाजन याला अटक करण्यात आली. या संदर्भात कासोदा पोलीस स्थानकात हवालदार समाधान सिंहले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक नीता कायटे करीत आहेत.