वडगाव मावळ । मागील काही दिवसांपासून वडगाव मावळ ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांऐवजी सरपंचपदाच्या खुर्चीसाठी राजकारण सुरू आहे. वडगाव-कातवी ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सरपंच अर्चना भोकरे यांना शौचालयावरून वारंवार पदावरून पायउतार व्हावे लागत आहे. या सत्तेच्या सारीपाटामुळे ग्रामपंचायतीच्या विकासाला खीळ बसली आहे. मागील काही दिवसांमध्ये अर्चना भोकरे यांचे सरपंचपद पुन्हा एकदा रद्द झाल्याने सध्या वडगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त आहे.
सरपंच अर्चना विलास भोकरे यांचे सरकारी जागेत अतिक्रमण तसेच शौचालय नसल्याने त्यांचे सदस्यत्व अपात्र करण्याची मागणी सदस्य किरण शंकर भिलारे यांनी केली होती. शुक्रवारी (दि.10) पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी भोकरे यांचे सदस्यत्व अपात्र ठरविल्याचा निकाल दिला आहे. सत्तासंघर्षामध्ये सरपंचपद वारंवार रिक्त होत आहे, त्यामुळे वडगाव-कातवी ग्रुप ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणी मावळ तहसीलदार यांच्याकडे शिवसेनेचे वडगाव उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी केली आहे.
ग्रामपंचायत बरखास्त करा
वडगावात काही दिवसांपासून खुर्चीचे राजकारण सुरू आहे. जिल्हाधिकार्यांनी सरपंच भोकरे यांना घरात शौचालय बांधले नाही म्हणून नुकतेच पुन्हा एकदा पदमुक्त केले आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्याने भोकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. एका महिला सरपंचांना वारंवार पायउतार व्हावे लागते ही सामान्य जनतेसाठी नाराजीची बाब आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणुकीनुसार महिलांचा आदर करणे ही शिवसैनिक म्हणून आमची जबाबदारी आहे. त्यामुळे ग्रामपंचायत बरखास्त करणे उचित राहील, असे शिंदे यांनी तहसीलदारांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. वडगावमध्ये काही ठिकाणी अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. जलशुद्धीकरणाची यंत्रणा नसल्यात जमा आहे. लहान-लहान रस्त्यांचे देखील घोटाळे होत आहेत. तसेच विविध विकासकामे खुंटलेली आहेत. त्यामुळे वैभवशाली वडगावच्या विकासाला सत्ता संघर्षामुळे एक प्रकारे कीड लागली आहे. जात, धर्म व पक्ष विसरून सर्वांनी एकत्रितपणे ग्रामपंचायतीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहायला हवे, असेही शिंदे म्हणाले.