खुशखबर… नवीन वर्षात पगारवाढ, नोकर्‍यांची संधी!

0

मुंबई : नोटाबंदी, जीएसटी आणि रेरा यासारख्या कायद्यांमुळे विविध क्षेत्रात आलेली मरगळ आता दूर होण्याची शक्यता असून, लवकरच नोकरदार आणि उद्योजकांसाठी चांगला काळ येणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात हे सुचिन्ह दिसून आले आहे. आर्थिकमंदीकडे बोट दाखवत काही कंपन्यांनी 2017 मध्ये पगारवाढही नाकारली होती. परंतु, आता अनेक कंपन्या 2018 मध्ये पगारवाढ करतील, असा अंदाज रोजगारक्षेत्राचा अभ्यास करणार्‍या मॅनपॉवर ग्रूपने वर्तवला आहे. 2018 मध्ये नोकरीच्या संधी वाढणार असून, कॉर्पोरेट कंपन्यांमधील नोकरदारांना 10 ते 15 टक्के पगारवाढ मिळेल, अशी खुशखबर आहे.

विविध क्षेत्रात सकारात्मक वातावरण
नोटाबंदी, जीएसटी आणि रेरामुळे महत्वाच्या उद्योगक्षेत्रांना चांगलाच फटका बसला. यामध्ये बांधकाम व्यावसाय, कापड उद्योग, आयटी, ऑटोमोबाईल्स, टेलिकॉम, अभियांत्रिकी, उत्पादन क्षेत्रात मरगळ आली होती. त्यामुळे अर्थव्यवस्थाही मंदावली होती. परिणामी, अनेकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या होत्या. नव्या नोकर्‍याच निर्माण झाल्या नाहीत. जानेवारी ते मार्च 2017 या तीन महिन्यांमध्ये नोकरीच्या संधी 22 टक्क्यांनी घटली. एप्रिल ते जून या काळात हे प्रमाण आणखी 19 टक्क्यांवर आले होते. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतही हा नकारात्मक ट्रेंड सुरूच होता. मात्र, ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात चित्र बदलले असून, सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

नोटाबंदी, जीएसटीच्या धक्क्यातून कंपन्या सावरल्या
2018 मध्ये टेलिकॉम, फायनान्स आणि स्टार्ट-अपसह अन्य क्षेत्रांमध्ये नवे रोजगार निर्माण होण्याची आशा मॅनपॉवर ग्रूपने व्यक्त केली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीच्या धक्क्यातून कंपन्या सावरल्याने कर्मचार्‍यांना 10 ते 15 टक्के पगारवाढ मिळू शकते, असा दिलासा मॅनपॉवर ग्रूपच्या अंदाजामुळे मिळाला आहे. 2017 मध्ये कर्मचार्‍यांना 8 ते 10 टक्के पगारवाढ मिळाली होती. त्या तुलनेत, येत्या वर्षात मनासारखी पगारवाढ मिळण्याची आशा नोकरदारांनी करण्यास काहीच हरकत नाही.