नवी दिल्ली: संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणू विरोधात अद्याप कोणत्याही प्रकारचे औषध, लस विकसित करण्यात आलेले नाही. जगातील सर्वच देश कोरोनावर औषध शोधण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान भारताला यात यश आले आहे. संपूर्ण भारतीय कंपनी असलेल्या भारत बायोटेकनं करोनावरील लस COVAXIN तयार केल्याची घोषणा केली. आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून त्यांनी यशस्वीरित्या भारतातील पहिली करोना लस तयार केली आहे.
जुलै महिन्यापासून या लसीची मानवी चाचणी सुरू केली जाणार असल्याची माहिती भारच बायोटेककडून देण्यात आली. “एसएआरएस-सीओव्ही -२ स्ट्रेनला पुण्यातील एनआयव्हीमध्ये वेगळी करण्यात आले आणि नंतर भारत बायोटेककडे वर्ग करण्यात आले. हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 (बायो-सेफ्टी लेव्हल 3) हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही लस विकसित करण्यात आली,” असे कंपनीनं निवेदनात म्हटले आहे.
भारतातील ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने फेज १ आणि फेज २ मानवी वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या अगोदर कंपनीने प्रीक्लिनिकल अभ्यासामधून मिळविलेले निकाल सादर केले होते. मानवी वैद्यकीय चाचण्या पुढील महिन्यात देशभरात सुरू होणार आहेत.
“सर्व प्रोटोकॉल्स पूर्ण करून कंपनीने वैद्यकीय चाचणी पूर्वीचा अभ्यास पूर्ण करण्याच्या उद्देशाने या संशोधनाला गती देण्यात आली. तसंच या अभ्यासाचे परिणाम प्रभावी आहेत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.