खूनातील संशयितांना पोलिस कोठडी

0

जळगाव। तांबापुरा येथील सलमान पटेल या तरूणाचा मेहरूण तलावावर पार्टीचा बहाणा करून घेवून जाणार्‍या मित्रांनीच त्याचा खून केल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी उघडकीस आली होती. यानंतर रात्रीच संशयित मुजफ्फर शेख कमल व अयाज उस्मान मणियार या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. दरम्यान, आज बुधवारी दोघांना न्यायाधीश बी.डी. गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना 11 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

कुटूंबियांनी व्यक्त केला होता घातपाताचा संशय
सलमानच्या घरसमोरच मुजफ्फर राहत असून त्याने सलमानच्या बहिणीची गेल्या वर्षी छेड काढली होती. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यात मुजफ्फरने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे याच जुन्या भांडणातून मुजफ्फर व अयाज मणियार यांनी सलमानचा काटा काढला. 25 मे रोजी सलमानचा विवाह होणार होता. त्यापूर्वीच 21 रोजी मुजफ्फर व अयाज यांनी लग्नाची पार्टी दे म्हणत मेहरूण तलावावर घेवून गेले. यानंतर त्याचा पाण्यात बुडवून खून केला. दरम्यान, सलमान बेपत्ता झाल्याने कुटूंबियांनी त्याचा शोध घेतला.

पण कोठेही नातेवईकांकडे मिळून आला नाही. अखेर पोलिसांना त्याचा मृतदेह सापडला. त्यानंतर घातपाताचा नातेवाईकांनी संशय व्यक्त केला होता. अखेर मंगळवारी सलमानचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मयत सलमान याचे वडील बाबू पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, रातो-रात पोलिसांनी संशयित मुजफ्फर व अयाज यांना अटक केली. दोघांना बुधवारी न्यायाधीश बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर खूनप्रकरणी कामकाज होवून न्या.बी.डी.गोरे यांनी दोघांना 11 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. ए.एफ.तडवी यांनी कामकाज पाहिले. दरम्यान, दोघांची पोलिसांकडून या प्रकरणाबाबत कसून चौकशी करण्यात येत आहे.