खून प्रकरणी दोघांना जन्मठेप

0

पुणे । अनैतिक संबंधातून तरुणाचा कुर्‍हाड आणि चॉपरने वार करून खून केल्याप्रकरणी दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी 10 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी दिला आहे. दंडापैकी 10 हजार रुपये मयत तरुणाच्या आईला देण्यात यावेत, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.

राजू पीटर लायल (35, रा. जनता वसाहत) आणि दिनेश ऊर्फ पॉल डॅनियल खाजेकर (25, रा. शुक्रवार पेठ) अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत. तन्मय अशोक मोरे (22, रा. जनता वसाहत) याच्या खून प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी 16 साक्षीदार तपासले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदीपान सावंत आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी केला. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस उपनिरीक्षक मीना तडवी आणि हवलदार मांडेकर यांनी मदत केली. खूनाची घटना 29 ऑक्टोबर 2011 रोजी शुक्रवार पेठ येथील एका लॉटरी सेंटरमध्ये घडली होती. तन्मय त्या लॉटरी सेंटरमध्ये कामाला होता. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे तो कामाला गेला होता. त्यावेळी आई आणि भाऊ तुषार तन्मयकडे पैसे नेण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोन व्यक्ती कुर्‍हाड, चॉपरने तन्मय याच्यावर वार करत असल्याचे त्या दोघांना दिसले. दोघांना पाहून आरोपी गुन्ह्यातील हत्यारासह पळून गेले. त्यावेळी तन्मय रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.