चाकण : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील रुग्णांना आरोग्यसेवा गावपातळीवर मिळावी याकरिता अनेक ठिकाणी आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात आली असून अशा आरोग्य उपकेंद्रातून रुग्णांना आरोग्य सुविधा मिळणे दुरापास्त झाले असून ही उपकेंद्रे सध्या समस्यांच्या विळख्यात सापडली असून केवळ दुरुस्ती अभावी त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यांची अशी दुरवस्था झाल्याने अनेक ठिकाणी रुग्ण शासकीय सेवेचा आधार न घेता खाजगी दवाखान्यात जाणे पसंद करू लागले आहेत. अशा ठिकाणी काम करणारे कर्मचारी देखील उपकेंदाच्या ठिकाणी पाहुण्यासारखे येत असून उपकेंद्राच्या आवारातच गोळ्या, औषधे जाळली जात असल्याने त्यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे अशी उभारण्यात आलेली आरोग्य उपकेंद्रे ही काही ठिकाणी असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे.
खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात तर बहुतांश आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणी आरोग्य सेवा देणारे कर्मचारी कधीही जागेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अशा ठिकाणी नागरिकांना गरज पडल्यास रात्री-अपरात्री आरोग्य सेवा मिळावी म्हणून सेवेच्या ठिकाणी कार्यरत असणार्या कर्मचार्यांनी निवासी राहून त्या ठिकाणी आरोग्य सेवा देणे बंधनकारक असते. परंतु नेमके गरजेच्या वेळी अशी उपकेंद्रे आरोग्य सेवा देण्यास निष्प्रभ ठरत असल्याने ती असून अडचण आणि नसून खोळंबा ठरत आहे. किवळे (ता.खेड) येथील आरोग्य उपकेंद्राची अशीच दुरवस्था झाली असून येथील खिडक्यांच्या जवळपास सर्वच काचा या तुटल्या असून यांचे रबर बाहेर लोंबकळत आहे. तसेच आत प्रवेश करण्याचे असणारे प्रमुख गेट देखील नादुरुस्त झाले आहे. याशिवाय येथील आउटलेटचे असणारे पाईप देखील अनेक ठिकाणी फुटले असल्याची परिस्थिती आहे.
याशिवाय सर्वात गंभीर बाब म्हणजे चांगल्या आरोग्य सेवेचा- संदेश देणार्या अशा अनेक आरोग्य उपकेंद्रात कालबाह्य झालेली? औषधे आणि गोळ्या उपकेंद्राच्या आवारातच जाळल्या जात आहेत. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण येथील आरोग्य उपकेंद्राच्या कंपाउंडचा दरवाजा हा नेहमी उघडा असतो. त्यामुळे त्यात कोणीही सहज प्रवेश करू शकतो. अशा वेळी जर लहान मुले अथवा जनावरे किंवा अन्य कोणीही इसम आत गेला आणि त्यांच्याकडून चुकून या गोळ्या खाण्याचा किंवा पडलेल्या औषधाच्या बाटल्या प्राशन करण्याचा प्रयत्न झाला तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्राला सन 2009-10 साली जवळपास 13 लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्यामुळे लाखो रुपये खर्च केल्यानंतर देखील नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नसतील तर अशा सेवेचा काय फायदा? असाही सवाल नागरिकांकडून केला जात आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात तर अशा आरोग्य उपकेंद्राच्या सेवेचा बोजवारा उडाला असून अनेक कर्मचारी उपकेंद्राकडे फिरकत देखील नाही अशी अवस्था आहे. अनेक ठिकाणी कार्यरत असणारे आरोग्यसेविका किंवा आरोग्य सहाय्यक हे केवळ दिखाव्यापुरते येतात असाही सूर नागरिकांमधून निघत आहे. किवळे येथील आरोग्य उपकेंद्रात तर कर्मचारी आठवड्यातून केवळ एकदाच गावात येतात असाही सूर येथील नागरिकांमधून निघत आहे. येथील आजूबाजूच्या उपकेंद्राचीदेखील अशीच भयानक परिस्थिती अनुभवयास येत आहे.
– तालुक्यातील सर्व आरोग्य उपकेंद्राची पाहणी करण्यात येईल. तसेच नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असेल तर अशांवर कारवाई करून त्यांची कुठलीही गय केली जाणार नाही.
– सुभद्रा शिंदे (सभापती, पंचायत समिती खेड)
पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत लवकरच खेड तालुक्यातील संपूर्ण आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांची तपासणी करण्याची मागणी करण्यात येणार असून, मी स्वतः याबाबत लक्ष घालून गोरगरीब नागरिकांच्या जिवाशी खेळणार्याची गय केली जाणार नाही. ज्या कर्मचारी वर्गाची नेमणूक केली आहे. त्यांनी संबधित ठिकाणी उपस्थित राहून रुग्ण सेवा करावी.
– शरद बुट्टे पाटील – गटनेते जिल्हा परिषद