खेडीत कचरा पेटला ; ग्रामस्थांचा रास्ता रोको

0

जामनेर मार्गावरील वाहनांच्या हवा सोडून काचा फोडल्या ; नगरपालिका कार्यालयावर आंदोलकांचा मोर्चा ; समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

भुसावळ- तालुक्यातील खेडी गावाकडे जाणार्‍या रस्त्यावरील डंपिंग ग्राऊंडऐवजी रस्त्यावरच पालिकेच्या कंत्राटदाराने कचरा टाकल्याने संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी भुसावळ-जामनेर रस्त्यावर ठिय्या मांडून संताप व्यक्त केला तर काहींनी येणार्‍या-जाणार्‍या वाहनांची हवा सोडत वाहनांवर दगडफेक केल्याने काही वाहनांच्या काचा फुटल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. यानंतर गावातील संतप्त तरुणांनी गोपाळ नगरातील नगरपालिका कार्यालय गाठून मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांच्याकडे संताप व्यक्त करीत समस्या सोडवण्याची मागणी केली याप्रसंगी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. समस्या तत्काळ न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. मुख्याधिकार्‍यांनी रस्त्यावर टाकलेला कचरा बाजूला हटवण्याचे आदेश देत यापुढे असे प्रकार झाल्यास दोषी कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे आश्‍वासन आंदोलक तरुणांना दिल्यानंतर आंदोलक माघारी परतले.

रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थ संतप्त
पालिकेचे वराडसीम गावाजवळ डंपिंग ग्राऊंड असलेतरी शहरातील साचलेला कचरा पालिकेतर्फे खेडी रस्त्यावरील डंपिंग ग्राऊंडवर टाकलो जातो मात्र बुधवारी रात्री कंत्राटदाराने रस्त्याच्या कडेला कचरा न टाकता तो रस्त्यावर टाकल्याने गावाकडे जाणारा मार्ग बंद झाल्याने गुरुवारी सकाळी गावातील शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचण निर्माण झाल्याने संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. गेल्या तीन वर्षांपासून वारंवार तक्रारी व आंदोलने करूनही प्रश्‍न सुटत नसल्याने ग्रामस्थांनी जामनेर रस्त्यावर ठिय्या मांडला तर काही तरुणांनी येणार्‍या-जाणार्‍या वाहनांची हवा सोडली तर काहींनी वाहनांवर दगडफेक केल्याने काही वाहनांच्या काचा फुटल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी घटना कळेस्तोवर आंदोलन आटोपले होते तर यानंतर काही तरुणांनी पालिका कार्यालय गाठून मुख्याधिकार्‍यांना जाब विचारत समस्या सोडवण्याची मागणी केली.

यांची होती उपस्थिती
मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांच्याशी चर्चा करताना नामदेव पाटील, अशोक सावळे, भैय्या महाजन, दीपक भोळे, गोलू महाजन, किरण चौधरी, मयुर महाजन, शालिक सावळे, गोकुळ महाजन, सुधाकर चौधरी, बबलू महाजन, कैलास महाजन, किसन भोळे यांच्यासह अन्य तरुणांची उपस्थिती होती.

दोषी कंत्राटदारावर कारवाई करणार -मुख्याधिकारी
खेडी ग्रामस्थांचा संताप स्वाभाविक आहे मात्र त्यांची समस्या आपण तत्काळ सोडवण्याचे आदेश संंबंधित विभागाला दिले आहेत. रस्त्यावरील कचरा हटवण्यात आला असून यापुढे रस्त्यावर कचरा टाकल्यास दोषी कंत्राटदारावर कारवाई केली जाईल, असे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर म्हणाले.