राजगुरूनगर : खेड तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी चाकण येथे सुसज्ज पत्रकार भवन बांधण्यात येईल, अशी ग्वाही आमदार सुरेश गोरे यांनी दिली. खेड तालुका प्रेस क्लबतर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पावसाळी अधिवेशन, पंचायत समिती पोटनिवडणूक, महामार्ग सद्यस्थिती या संदर्भात सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, किरण मांजरे, लक्ष्मण जाधव, किरण गवारी, विशाल पोतले, बिपिन रासकर, मनोहर गोरे उपस्थित होते. सहसचिव अमित टाकळकर यांनी स्वागत केले. अध्यक्ष हरिदास कड यांनी प्रास्ताविक तर सचिव हनुमंत देवकर यांनी आभार मानले.
शिवसेना प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे. शेतकर्यांना न्याय मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरूच आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी काळे हे दर सोमवारी विधानभवन कार्यालयात चर्चेसाठी उपलब्ध राहणार आहेत, असे चर्चेवेळी आमदार गोरे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे येलवाडीच्या हद्दीत संत तुकाराम अध्ययन केंद्राच्या निर्मितीचा प्रस्ताव पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांना सादर केला आहे. नवीन महामार्गांमुळे दळणवळण सुविधा वाढणार असून, त्याची भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे, असेही ते म्हणाले. भामचंद्रनगर परिसराचा देहू-आळंदी विकास आराखड्यात समावेश करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
संघटनशक्तीमुळेच विजय
पंचायत समिती पोटनिवडणुकीतील यशाचे श्रेय त्यांनी शिवसैनिकांच्या संघटनशक्तीला दिले. पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे पंचायत समितीत शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळाल्याने यापुढे विकासकामे जोरात होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. काँग्रेसचे एकमेव सदस्य अमोल पवार यांच्या उपसभापती पदाबद्दल मात्र, त्यांनी बोलणे टाळले. खेड तालुका प्रेस क्लबच्या पत्रकारांना तात्पुरत्या स्वरुपात कार्यालयासाठी पंचायत समिती आवारात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी मान्य केली. प्रेस क्लबच्या पत्रकारांना जिल्हाधिकार्यांच्या कोट्यातून विशेष कार्यकारी अधिकारी (एसइओ) करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.