नवी दिल्ली । भारतीय क्रिकेटपटू आणि माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केल्यानंतर खेळाडूंची पगारवाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय क्रिकेपटूंच्या मानधन करारातील रकमेत वाढ करण्याचा आम्ही विचार करत आहोत, असे बीसीसीआयच्या वतीने प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी सांगितले आहे. क्रिकेटविश्वातील सर्वात श्रीमंत असलेल्या बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी करारबद्ध खेळाडूंच्या पगारात दुप्पट आणि सामना मानधनातही वाढ केली, परंतु ही वाढ पुरेशी आणि तुटपुंजी असल्याची टीका सर्व प्रमुख खेळाडूंनी केली होती. रवी शास्त्री यांनी तर ही वाढ फारच कमी असल्याचे विधान केले होते.
मानधनात यंदा दुपटीने वाढ : भारतीय खेळाडूंच्या मानधनात यंदा दुपटीने वाढ करण्यात आली आहे. मात्र रवी शास्त्री यांच्याश अनेक आजी-माजी खेळाडूंनी या मानधन वाढीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘भारतीय खेळाडूंना मिळत असलेले मानधन काहीच नाही. दोन कोटी रुपये अतिशय कमी आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना किती पैसे मिळत आहेत,’ अशा शब्दांमध्ये रवी शास्त्री यांनी मानधन वाढीबद्दल नाराजी व्यक्त केली. बीसीसीआयकडून खेळाडूंना देण्यात येणार्या मानधनावर बोलताना रवी शास्त्री यांनी ‘पुजारासाठी आयपीएलमधील कोणत्याही संघाने बोली लावलेली नाही. सौराष्ट्रचा हा खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. याबद्दल पुजाराच्या मनात काही चिंता आहे का, हे बीसीसीआयने जाणून घ्यायला हवे,’ असे म्हटले होते.
दोन महिन्यांत तोडगा काढणार
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या बीसीसीआय प्रशासन समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी या विषयावर बुधवारी विराट कोहलीची भेट घेतली. 2016-17 चा करार अगोदरच निश्चित झाला आहे, तरीही खेळाडूंच्या मागणीचा आम्ही पुढील मोसमासाठी विचार करू, असे राय यांनी म्हटले आहे. येत्या दोन महिन्यांत निश्चितच यावर तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी नमूद केले आहे. 2016-17 च्या करारानुसार अ ब क श्रेणीतील खेळाडूंना अनुक्रमे दोन कोटी, एक कोटी आणि 50 लाख रुपये मिळणार आहेत, परंतु ऑस्ट्रेलियासारख्या देशात अ श्रेणीतील खेळाडूंना 10 कोटी मिळत असल्याचे खेळाडूंचे म्हणणे आहे. आम्ही मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्याशी चर्चा केली आहे आणि त्यांना नव्या करार रकमेचे प्रेझेंटेशन तयार करायला सांगितले असल्याचे राय म्हणाले.
विराटसह अनेकांनी केली मागणी
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने देखील खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. अ गटातील खेळाडूंना 2 कोटींऐवजी किमान 5 कोटी दिले जावेत, असे कोहलीने म्हटले होते. याशिवाय, खेळाडूंनीही बीसीसीआयकडून अजूनही आपल्याला अपेक्षित मानधन मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. त्यानंतर खुद्द विराट कोहलीनेच ‘अ’ गटातील खेळाडूंचे मानधन किमान 5 कोटी इतके असावे, अशी मागणी करून खेळाडूंमधील नाराजीच्या भावनेला वाचा फोडली. बीसीसीआयच्या प्रशासक समितीने येत्या 5 एप्रिल रोजी बैठक घेऊन या वादावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, इंग्लंडचा खेळाडू जो रुट यांनाही त्यांच्या संबंधित क्रिकेट बोर्डाकडून आपल्या तुलनेत जास्त मानधन दिले जात असल्याचाही मुद्दा बीसीसीआयसमोर उपस्थित केला. अनिल कुंबळे यांनीही कोहलीच्या विधानाला पाठिंबा दिला आहे.