नंदुरबार। खेळातून आपल्या संस्कृतीची जोपासना करावी, खेळण्याने आपले आरोग्य निरोगी राहते, असे प्रतिपादन प्रा.पुष्पेंद्र रघुवंशी यांनी केले. येथील उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण समारोपप्रसंगी ते बोलत होते. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व आबाजी स्पोर्टस् क्लब नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार येथील यशवंत विद्यालय क्रीडंगणावर दि.15 ते 30 एप्रिल 2017 दरम्यान उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.
विविध खेळांचे प्रशिक्षण
या प्रशिक्षण शिबिरात कबड्डी, खो-खो, रिंगटेनिस, बॉक्सिंग, क्रिकेट, टारगेट बॉल, योगा, मैदानी खेळ, फ्लोअरबॉल आदी खेळांचे प्रशिक्षण राबविण्यात आले. शिबिरामध्ये विविध खेळाच्या तंत्राचे बारकाईने प्रशिक्षण देण्यात आले. तसेच खेळाच्या नियमांविषयी देखील सहभागी प्रशिक्षणार्थी खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात आले. नुकताच याप्रशिक्षण शिबिराचा समारोप झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार तालुका विधायक समितीचे कार्यालयीन अधिक्षक पुष्पेंद्र रघुवंशी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी सी.जी.पाटील, पंकज पाठक, अनिल रौंदळ, मयुर ठाकरे, किरण बेडसे आदी उपस्थित होते. यावेळी शिबिरात सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सुप्त गुणांना वाव
समारोप प्रसंगी पुष्पेंद्र रघुवंशी पुढे म्हणाले, की विद्यार्थी वयात जेवढे जास्त खेळ खेळता येतील तेवढे खेळ खेळण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरुन शारिरीक व बौद्धिक विकास होण्यास मदत होवून आपल्या सुप्त गुणांना वाव मिळेल. यावेळी प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र गौरविण्यात आले. तसेच प्रशिक्षक जगदिश वंजारी, राकेश माळी, जितेंद्र माळी, विजय जगताप, मनिष सनेर, योगेश माळी, दिनेश कुंभार, जयेश राजपूत, मनोज कुलथे यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रविण परदेशी तर आभार अनिल रौंदळ यांनी मानले.