खोटे अपंग प्रमाणपत्र दिल्यास थेट फौजदारी

0

जळगाव । जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पदभार स्विकारताच जिल्हा परिषद सेवेतील सर्व अपंग कर्मचार्‍यांना मुंबई येथून तपासणी करुन अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र सादर करावयाचे आदेश दिले होते. कर्मचार्‍यांची मुळ स्थिती व अपंगत्व प्रमाणपत्र याच्यात तफावत आढळल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यानी सर्व विभागाना दिले होते.

अनेक कर्मचार्‍यांकडून शासकीय सवलती तसेच इतर लाभ घेण्यासाठी बोगस अपंग प्रमाणपत्र सादर केले जाते. यावर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी आदेश जाहीर केले होते. बदली प्रक्रियेपासून बचाव करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक शिक्षक, ग्रामसेवक आणि विविध विभागातील कर्मचार्‍यांनी बनावट अपंगांचे दाखले जोडून सवलती मिळविल्या आहेत. त्यामुळे खर्‍या अपंगांवर आणि इतर कर्मचार्‍यांवर अन्याय होत असतो. याबाबत अनेकदा तक्रारी झाल्यात. मात्र वैद्यकीय दाखले ग्राह्य धरून दुर्लक्ष करण्यात आले. वैद्यकीय दाखल्यांबाबतही तक्रारी झाल्यात त्यानंतर सर्व अपंग कर्मचार्‍यांची धुळे येथील वैद्यकीय बोर्डाकडून पडताळणीचे आदेश दिले होते. मात्र त्यातही गैरप्रकार झाल्याची तक्रार आहे. शासनाकडून देण्यात येणार्‍या अपंग भाडे सवलती, अपंग भत्ता, आदींचा फायदा घेत शासनाला लुबाडले जात होते. अत्याधुनिक औषधी यंत्रणा उपलब्ध असताना अपंगांची संख्या वाढली आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तक्रारीची दखल घेत 12 जून रोजी फेर तपासणीचे आदेश निर्गमित केले आहेत.