खोटे दस्तावेजातून लाटला साडेतेरा लाखाचा भूसंपादन मोबदला

0

फैजपूर प्रांत कार्यालयातील घटना ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

फैजपूर- प्रांताधिकारी कार्यालयात खोटे दस्तावेज व खोटे नातेवाईक दाखवून शेत जमिनीचा तब्बल साडे तेरा लाखाचा भूसंपादनाचा मोबदला लाटल्या प्रकरणी अंजाळे येथील त्र्यंबक रामचंद्र सपकाळे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा शुक्रवारी दाखल करण्यात आला. त्र्यंबक सपकाळे यांनी 1 सप्टेंबर 18 ते 31 डिसेंबर 18 या कालावधीत यावल तालुक्यातील शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पांतर्गत गट नंबर 464, 467 या शेत-जमिनीचा मोबदला घेण्यासाठी फैजपूर प्रांत कार्यालयात खोटे नातेवाईक व खोटे दस्तावेज सादर करून ते खरे असल्याचे भासवत शासनाची फसवणूक केली. भूसंपादनाचा तब्बल 13 लाख 41 हजार 850 रुपयांचा मोबदला लाटला. याबाबतची माहिती खर्‍या नातेवाईकांना मिळाल्यावर त्यांनी प्रांत कार्यालयात धाव घेतली व त्यानंतर हे बिंग फुटले. प्रांत कार्यालयाने या प्रकरणाची खोलवर चौकशी केल्यावर खरा प्रकार उघडकीस आला याप्रकरणी प्रांत कार्यालयातील कर्मचारी कौशल प्रल्हाद चौधरी यांनी तक्रार दिल्यावरून त्र्यंबक रामचंद्र सपकाळे यांच्याविरुद्ध पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आधार निकुंभे करीत आहे.