माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची न्यायालयात धाव ; आदेशानंतर दाखल झाला गुन्हा
भुसावळ- माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना अडकावण्यासाठी खोटे दस्तावेज तयार करून उच्च न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह सहा जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तब्बल दिड महिन्यांपासून मुक्ताईनगर पोलिसांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे कैफियत मांडूनही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने खडसे यांनी कोर्टात धाव घेतली होती. मंगळवारी मुक्ताईनगर न्यायालयात याबाबत तीन तास युक्तिवाद झाला. यावर न्यायालयाने 24 तासाच्या आत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
खडसे यांनी बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता मुक्ताईनगर पोलिसात न्यायालयाचा आदेश सादर केला. त्यानंतर पोलिसांनी दखल घेत अंजली अनिष दमानिया (सांताक्रुझ ईस्ट, मुंबई), रोशनी राऊत (न्यू सर्व्हिस रोड, खरगाव, कालवा, जि.ठाणे), गजानन पुंडलिक मालपूरे (यशवंत कॉलनी, रींग रोड, जळगाव), सुशांत परशुराम कुर्हाडे (सुखकर्ता, सीएचएस करी रोड, ईस्ट मुंबई), सदाशीव व्यंकट सुब्रमनियम (निल सिद्धी टॉवर्स, सेक्टर 12, वाशी, नवी मुंबई), चारमैन फर्नस (लोखंडवाडा कॉम्प्लेक्स, अंधेरी वेस्ट, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी एकनाथराव खडसे यांनी अंजली दमानिया यांच्याविरुद्ध 19 एप्रिल रोजी कट रचल्याच्या वक्तव्यावरुन गुन्हा दाखल केला होता.