मोखाडा । खोडाळा ते मोखाडादरम्यान ठिकठिकाणी दोन्ही बाजूने खोल दरी आहे. चालू आर्थिक वर्षात या मार्गावर मोठ्या प्रमाणावर संरंक्षक भिंतींची कामे झालेली आहेत. मोठ्या प्रमाणावर भराव टाकून रस्ता रूंदीकरण केलेले आहे. मात्र, यापैकी कोणत्याही ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एकही सुचना फलक लावण्यांत आलेला नाही. त्यामुळे अपघात होऊन मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी एकाच महिन्यात देवबांध घाटात दोन अपघात झाले होते. पैकी एका अपघातात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागलेला आहे. त्यानंतर या रस्त्यावर मोठी संरक्षक भिंत मोखाडा उपविभागाच्या निगराणीत बांधण्यांत आलेली आहे. अशाच प्रकारे ठिकठिकाणी भिंती घालण्यात आलेल्या आहेत. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भराव टाकून रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आलेले आहे.
रस्ते दुरुस्त करण्याची मागणी
खोडाळा-मोखाडा, खोडाळा-वाडा आणि खोडाळा-विहीगावदरम्यान बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे कडे तुटून साईडपट्टी सकट दरीत कोसळलेले आहेत. त्यामूळे रात्री अपरात्री मार्गक्रमण करणार्या वाहनांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. दरम्यान अशाच प्रकारे खोडाळा वाडा मार्गावर दरड कोसळल्याने निम्मा रस्ताच दरीत भुईसपाट झाला होता. अजूनही त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू असून परिवहन व्यवस्था पुरती कोलमडलेली आहे. त्यामूळे प्रवाशांना मिळेल त्या वाहनांनी बाजारपेठांकडे प्रस्थान करावे लागत आहे. प्रवाशांची आणि परिवहन सेवेची खोटी ही रस्त्यांच्या तुटलेल्या कड्यांमुळे पुन्हा होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची तातडीने दखल घेवून रस्ते दुरूस्तीच्या कामाला युध्दपातळीवर सुरुवात करण्याची मागणी प्रवासी हितवर्धक संघाने केलेली आहे.