इंदापूर । ऑलिंपिकमध्ये खो-खो खेळाला महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी खो-खो खेळाडू जिवापाड सराव करून खेळताहेत हा खेळ देशाच्या वैभवात भरच घालण्यासाठी खेळला जात आहे असे गौरवोद्गार शरयु फाउंडेशनच्या प्रमुख शर्मिला पवार यांनी काढले.ऑल इंडिया मॉडर्न खो-खो युथ नॅशनल चॅम्पियनशिप 2017-18चे बक्षीस वितरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रवीण माने, करणसिंह घोलप आदी उपस्थित होते.
पवार म्हणाल्या, सर्व राज्यातील खो-खो खेळाडू आपलेच आहेत, या खेळासाठी चाललेली मेहनत व सराव उल्लेखनीय आहे. अनेक राज्यातील मुलींच्या खो-खो संघाने शेटफळ हवेलीसारख्या ग्रामीण भागात येऊनसुद्धा खेळातून आपल्या राज्यांचे गुण दाखविले व खेळाचे मैदान यशस्वी केले. खो-खो खेळाला स्मृतीपटलांवर आणण्याची किमया करणारे असोसिएशनचे काम उत्तम आहे, यासाठी शरयु फाउंडेशनच्या वतीने शक्य ती मदत केली जाईल अशीही ग्वाही पवार यांनी दिली. यावेळी हरियाना राज्यातील खो-खो संघाने नॅशनल चॅम्पियनशिप जिंकली या संघाला सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
हरियाना संघ (प्रथम क्रमांक), गोवा संघ (द्वितीय संघ) व कर्नाटक संघ (तृतीय क्रमांक) या संघांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. सुभाष देसाई, सचिन ननवरे, नानासाहेब शेंडे, सचिन आरडे, माऊली वाघमोडे, माऊली चवरे, विजय शिंदे, शुभम निंबाळकर, अनिल काळे, डी. एन. जगताप, अॅड.तेजसिंह पाटील, शिवाजी तरंगे, शिवाजी इजगुडे, अतुल शिंदे, संतोष बनकर, विजय कानगुडे, सुभाष मोरे आदी उपस्थित होते.