पुणे । डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि विश्व शांती केंद्र (आळंदी) पुणेतर्फे संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या नावाने दिला जाणारा तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर माऊली जागतिक शांतता पुरस्कार 2017 अमेरिकेतील चर्च ऑफ जीझस ख्राइस्ट लॅटर डे सेंट्सचे प्रमुख मार्गदर्शक एल्डर डी. टॉड ख्रिस्तोफरसन यांना दिला जाणार आहे. सोमवारी (दि.14) सकाळी 10 वाजता एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणातील स्वामी विवेकानंद सभामंडपात त्यांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
संत श्री ज्ञानेश्वर माऊली व जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचे ज्ञान-विज्ञानाधिष्ठित तत्त्वज्ञान व सिद्धांत जगासमोर मांडण्याच्या हेतूने हा पुरस्कार दिला जात आहे. या पुरस्काराचे वितरण नोबेल चॅरिटेबल ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉ.मायकेल नोबेल आणि महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शुभहस्ते आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. याप्रसंगी तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती पुरस्कार समितीचे अध्यक्ष आणि जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. आर.ए. माशेलकर (एफआरएस), संगणक तज्ज्ञ डॉ.विजय भटकर, पटकथा लेखक जावेद अख्तर, इंडियन मर्चन्टस चेंबरचे माजी अध्यक्ष नानिक रूपानी हे उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परुषदेत यावेळी कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्या कार्यकारी संचालिका प्रा. स्वाती कराड-चाटे, एमआयटी डब्ल्यपीयूचे कुलसचिव प्रा. डी.पी. आपटे आणि मिटसॉटचे संचालक डॉ. मिलींद पांडे, श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे उपस्थित होते.
अमेरिकेतील मान्यवरांची उपस्थिती
पुरस्कार वितरण सोहळ्या अमेरिकेतील जगविख्यात विद्यापीठांचे अध्यक्ष डॉ. स्टीफन मॉर्गन, डॉ. मॅथ्यू हॉलंड, डॉ. डिनीस हुफ्तालिन, डॉ. रिचर्ड नेल्सन यांच्यासह जगविख्यात शास्त्रज्ञ, आध्यात्मिक गुरू, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, अशा विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
जागतिक शिखर परिषदेचे आयोजन
डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि विश्व शांती केंद्र (आळंदी) पुणेतर्फे विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून विश्वशांती या विषयावर दोन दिवसीय जागतिक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 13 व 14 ऑगस्ट रोजी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणातील स्वामी विवेकानंद सभामंडपात ही परिषद होणार आहे. याचे उद्घाटन इस्त्रोचे माजी अध्यक्ष माधवन नायर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत.