मुंबई – परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमधील रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावावर बँकांच्या मदतीने केलेला घोटाळा ६५० कोटी रूपयांपेक्षा जास्त रकमेचा असून या घोटाळ्याची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेकडून (सीबीआय) चौकशी करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी केली.
यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांनीही या प्रकरणाची गंभीर नोंद घ्यावी, असे ते म्हणाले.
शिवसेनेचा पुन्हा दुटप्पीपणा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर जिल्हा बँकांसमोर ढोल बडवण्याच्या शिवसेनेच्या आंदोलनावरही मुंडे यांनी टीका केली. शिवसेना राज्य व केंद्र सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या अंमलबजावणीची जबाबदारी त्यांचीच आहे. ते त्यांचे घटनात्मक कर्तव्य आहे. असे असताना जिल्हा बँकांसमोर ढोल बडवण्याचे नाटक करण्याऐवजी त्यांनी शासन म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे. सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीच्या मांडीला मांडी लावून बसायचे व बाहेर ढोल वाजवायचा हा दुटप्पीपणा आहे, असे ते म्हणाले.
स्वाती साठे यांना निलंबित करा
भायखळा कारागृहातील वार्डन कैदी मंजुळा शेट्ये यांच्यावर लैंगिक अत्याचार, मारहाण करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तुरूंग अधिकारी-कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न खुद्द तुरूंग उपमहानिरिक्षक स्वाती साठे यांनी केल्याचे त्यांच्या व्हॉटस्अॅप् मॅसेजवरून स्पष्ट होत आहे. हत्त्येसारख्या गंभीर गुन्ह्याच्या तपासात अडथळे आणण्याचा व आरोपींना मदत करण्याचा त्यांचा हेतू दिसून येतो. आरोपींना मदत करण्याची मानसिकता असलेली व्यक्ती वरिष्ठ तुरूंग अधिकारीपदी असणे योग्य नसल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी तसेच त्यांच्या हितसंबंधांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही मुंडे यांनी केली.
विश्वास पाटील यांच्या निर्णयांची चौकशी करा
झोपडपट्टी सुधार प्राधिकरणाचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी सेवेच्या शेवटच्या पाच दिवसात ४५० नस्त्या मंजूर केल्याचे प्रकरण संशयास्पद आहे. यात आर्थिक गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता असल्याने त्यांनी शेवटच्या महिन्यात मंजुरी दिलेल्या सर्व प्रकरणांना स्थगिती द्यावी. या कालावधीतील त्यांच्या दूरध्वनी, आवकजावकच्या नोंदी, टपालवही ताब्यात घ्यावी आणि त्यांच्या कारकिर्दीतील सर्व व्यवहारांची विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
कुलगुरू डॉ. देशमुख यांना हाकला
मुंबई विद्यापीठ परीक्षाप्रक्रियेत उडालेला गोंधळ तसेच परीक्षांचे निकाल वेळेवर न लागल्याने झालेले विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्यपालांना आदेश द्यावे लागल्याची घटना ताजी असताना विद्यापीठाने १११ कोटींच्या ठेवी मुदतपूर्व काढण्यात आल्याची माहीती समोर आली आहे. यातून विद्यापीठाचा बेजबाबदार, नियोजनशून्य कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. याची जबाबदारी सर्वस्वी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची असल्याने राज्यपालांनी त्यांना तत्काळ पदावरून दूर करावे, अशी मागणी मुंडे यांनी केली.