गंगापुरीतील युवकाच्या खुनाचा उलगडा : आरोपी अखेर एलसीबीच्या जाळ्यात

जळगाव : दारूच्या नशेत केलेल्या शिविगाळ नंतर संतप्त झालेल्या वॉचमनने गंगापुरीच्या युवकाचा फावड्याच्या दांड्याने गळा दाबून खून केल्याची कबुली दिली आहे. एलसीबीने चिंचखेडा गावातून आरोपी नथ्थू काळू सुरळकर (28, रा.चिंचखेडा, ता.जामनेर) यास अटक केली आहे. या घटनेत शाम फकीरा ठाकरे (30, रा.गंगापूरी, ता.जामनेर) या यूवकाचा खुन झाला होता.

अज्ञाताविरोधात दाखल होता गुन्हा
25 जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गंगापूरी गावातील एक दाम्पत्य फलोद्यानात रानतुळस घेण्यासाठी गेले असता पळसाच्या झाडाखाली मृतदेह आढळला होता. याबाबत दाम्पत्याने या ठिकाणचे वॉचमन नथ्थू सुरळकर यास सांगितले होते. सुरळकर याने त्याच्या जोडीदाराला फोन केला होता. घटनेची माहिती मिळाल्यावर जामनेर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह रुग्णालयात हलविला होता. मयत हा गंगापूर गावातील शाम फकीरा ठाकरे असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखेने केली उकल
पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी गुन्ह्यांची गंभीर दखल घेत संशयिताचा शोध घेवून त्याला अटक करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. तसेच जामनेर पोलिसांकडूनही या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु होता. तब्बल 20 दिवसांच्या तपासानंतर स्थानिक गुन्हेच्या पथकाने संशयिताबाबत माहिती निष्पन्न केली. मृतदेह ज्या दिवशी आढळला त्या दिवशी घटनास्थळी असलेला वनविभागाचा वॉचमन नथ्थू सुरळकर यानेच हा खून केल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक जालींदर पळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील दामोदरे, जयंत चौधरी, लक्ष्मण पाटील, संदीप सावळे, रणजित जाधव, किशोर जाधव, विनोद पाटील, ईश्वर पाटील, दर्शन ढाकणे, प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने गुरुवारी चिंचखेडा गावातून नथ्थू सुरळकर यास ताब्यात घेतले.

शिविगाळ केल्याने केला खून
मयत शाम ठाकरे हा झोपडीजवळ आला, दारुच्या नशेत तो विनाकारण आई वडीलांवरुन शिवीगाळ करत होता तसेच मला मारण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे मी रागात येवून माझ्याजवळील फावड्याच्या दांडक्याने शामचा गळा दाबून त्याला मारुन टाकल्याची कबूली दिली संशयित नथ्थू सुरळकर याने पोलिसांना दिली. पुढील कारवाईसाठी संशयित नथ्थू सुरळकर यास जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.