जळगाव। निर्मिती रिअल टेक सर्व्हिसेस नावाने विसनजीनगरात कार्यालय थाटून ज्यादा व्याजदराचे आमिष दाखवित जळगावातील नागरिकांना सुमारे 70 लाख रुपयांचा गंडा घालणार्या भामट्यास जळगाव जिल्हा पेठ पोलिसांनी उत्तर प्रदेशात अटक केली होती. दरम्यान, त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला रविवारी न्यायाधीश आर.आर.भळगट यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 7 जून पर्यंत वाढीव पोलिस कोठडी सुनावली आहे.
7 जून पर्यंत पोलिस कोठडीचे दिले आदेश
विसनजीनगरात पंकज रणवीर राठोड (वय 28, मूळ रा. सहारनपूर, ता. नकूड, उत्तर प्रदेश) याने 2 फेब्रुवारी 2011 रोजी निर्मिती रिअल टेक सर्व्हीसेस प्रा.लि. नावाने कार्यालय उघडले होते. ज्यादा व्याजदराच्या आमिषाने शहरातील सुमारे 2 हजार नागरिकांनी त्याच्या कंपनीत सुमारे 70 लाखांची गुंतवणूक केली होती. तीन वर्ष नियमित पैसे परत केल्यानंतर जून 2015 मध्ये पंकज कंपनीचा गाशा गुंडाळून पसार झाला होता. या प्रकरणी गायत्री विश्वनाथ सेानवणे (वय 34, रा. आंबेडकरनगर, खेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 27 ऑक्टोबर 2016 रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पंकज राठोड याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला जिल्हापेठ पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्यांनी 4 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज रविवारी पंकज राठोड यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपली असता त्याला न्यायाधीश आर.आर. भळगट यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्या.भळगट यांनी संशयित राठोड याला वाढीव पोलिस कोठडीत देत 7 जुन पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सरकारतर्फे अॅड. अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले.