गंभीर गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार आरोपीला अटक

0

खंडणी दरोडा विरोधी पथकाची कामगिरी

कासारवाडी : खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 17) कासारवाडी येथे केली. आदेश रमेश आंबोरे (वय 25, रा. कासारवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी आदेश 2015 साली खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील आरोपी होता. गुन्हा केल्यापासून अद्यापपर्यंत तो फरार होता. शनिवारी पोलीस नाईक किरण काटकर यांना माहिती मिळाली की, आदेश कासारवाडी येथील मेट्रोच्या साईटवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत आहे. तो भारत पेट्रोल पंपाशेजारी नारळपाणी विकणार्‍या हातगाडी जवळ उभा असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार खंडणी दरोडा विरोधी पथकाने भारत पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे त्याला खंडणी दरोडा विरोधी शाखेत आणून कसून चौकशी केली असता त्याने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्न गुन्ह्याची कबुली दिली. यावरून त्याला अटक करून एमआयडीसी भोसरी पोलिसांकडे सोपविण्यात आले. ही कामगिरी खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे, कर्मचारी अजय भोसले, महेश खांडे, राजेंद्र शिंदे, अशोक दुधवणे, उमेश पुलगम, नितीन लोखंडे, किरण काटकर, निशिकांत काळे, विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने केली.