गंमत जत्रेमध्ये दिव्यांग मुलांनी लुटला मनमुराद आनंद

0

पुणे । अंधार्‍या आयुष्यात चिमुकल्या बोटांनी एकमेकांना मैत्रीचा हात देत प्रकाशवाटा प्रज्वलित करणार्‍या दृष्टीहिन मुलांसह चेहर्‍यावरील निरागस हावभावांनी आजूबाजूला असलेल्या मित्रांच्या मनातले भाव जाणणार्‍या मूकबधिर आणि कर्णबधिर मुलांनी गंमत जत्रेत सहभागी होत गमतीच्या खेळांचा मनमुराद आनंद लुटला. फेस पेटिंगमधून झालेला स्वत:चाच विदूषकाचा चेहरा आरशामध्ये पाहण्यासोबतच अगदी फोटो कॉर्नरमध्ये मनमोकळे हास्य करीत सेल्फी काढणारे हे विशेष तारे बालदिनी जमिन पर अवतरल्याचा भास होत होता.

450 हून अधिक दिव्यांग मुले-मुली
लिओ क्लब ऑफ पूना नेचर लव्हर्स या संस्थेतर्फे विशेष मुलांना बालदिनाचा आनंद मिळवून देण्याकरीता एपिक कार्निव्हलचे आयोजन स्वारगेटजवळील ओसवाल बंधू कार्यालयात करण्यात आले. यावेळी समाजकल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार, शाम झंवर, राजकुमार अग्रवाल, कैलाश झंवर, जगदीश अग्रवाल, गोविंद मुंदडा, शाम भुतडा आदी उपस्थित होते. विविध संस्थांमधील 450 हून अधिक दृष्टीहिन, अपंग, बहुविकलांग, मतिमंद असे दिव्यांग मुले-मुली सहभागी झाले होते.

करमणुकीचे कार्यक्रम
फेसपेटिंग, हँड प्रिंट वॉल, फोटो बुथ, जादूचे प्रयोग, जंपिंग जॅक, पॉटरी मेकिंग, टॅटू यांसह गमतीचे खेळ, विविध राईडस आणि करमणुकीचे कार्यक्रम या मुलांकरीता तरुणाईने आयोजित केले होते. त्यामध्ये प्रत्येक संस्थेतील मुलांनी उत्साहने सहभाग घेतला. पॉटरी मेकिंगच्या स्टॉलवर मातीची भांडी बनविण्यासाठी दृष्टीहिन मुलांनी विशेष गर्दी केली. चाकावर फिरणा-या मातीच्या गोळ्याला चिमुकल्या बोटांनी आकार देतानाचा अनोखा स्पर्श त्यांनी अनुभविला.