बारामती । माळेगाव ग्रामपंचायतीमध्ये भाजपने यशस्वीरीत्या शिरकाव केला असून बारामती तालुक्यातील एक महत्त्वाची ग्रामपंचायत ताब्यात मिळविली आहे. त्यामुळे माळेगाव कारखान्याचे चेअरमन रंजनकाका तावरे व जेष्ठ सहकारतज्ज्ञ चंदरअण्णा तावरे यांचा विश्वास चांगलाच दुणावला आहे. बारामती तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. याच तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना हा भाजपच्या ताब्यात असून याच कार्यक्षेत्रातील माळेगाव ग्रामपंचायत ताब्यात मिळविल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
बारामती तालुक्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, त्यांची कन्या सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पावर, भाजपचे राज्यसभा सदस्य अमर साबळे असे भलेमोठे राजकीय दिग्गज आहेत. तालुक्यातील सर्व सहकारी संस्था या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. या बालेकिल्ल्याला धक्का लागू नये म्हणून अजित पवार सातत्याने प्रयत्न करीत असतात. मात्र या प्रयत्नांना सुरुंग लावण्याचे काम भाजपचे रंजनकाका तावरे करीत असतात. भाजपचा कोणताही सहभाग नसताना रंजनकाका तावरे यांनी यशस्वीरीत्या माळेगाव ग्रामपंचायत ताब्यात घेतली हे विशेष म्हणावे लागेल.
माळेगाव येथील राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदिप तावरे यांनी ग्रामपंचायत सदस्य अशोक सस्ते यांना ग्रामपंचायत कार्यालयातच मारहाण करून आपल्या गुंडगिरीचे प्रदर्शनच केले. कालपर्यंत अशोक सस्ते हे माजी सरपंचांबरोबरच होते. मात्र, ग्रामपंचायतीतील कारभाराचे घोटाळे पाहिल्यानंतर तसेच माजी सरपंचांची ठेकेदारी पाहता सस्ते यांनी आपला मार्ग बदलला. व भाजपबरोबर जात त्यांनी रंजनकाका तावरे यांना साथ दिली. याचा राग मनात धरून मारहाण करणे हे राष्ट्रवादीला शोभणारे असेच कृत्य होते. मात्र, रंजन तावरे यांनी राष्ट्रवादीला या मारहाणीवरून जशास तसे उत्तर देऊ असे आव्हान दिले आहे. यामुळे राष्ट्रवादीत गडबड झाली आहे. माळेगाव ग्रामपंचायतीत दहा मताने ठराव जिंकल्याने भाजपचा सरपंच झाला. हे वास्तव खिलाडूपणाने राष्ट्रवादीने न स्विकारता, हाणामारीचे धोरण स्विकारले. यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादीच्या गुंडगिरीवर बारामतीकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्यात राष्ट्रवादीला घरघर लागली असून शिवसेना मात्र सुस्त आहे. वास्तविक पाहता भाजपाने एकजुटीने काम करावे, असा सूर आवळला जात आहे. मात्र भाजपात दोन गट असून एक गट नेहमीच आतून राष्ट्रवादीला हात देत असतो. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही सुधारणा होत नाही. हे पाहूनच निष्ठावान गटाने भाजपचे काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता हा अस्वस्थ असून कोणत्या गटाचे काम करावे. हेच कळत नाही. यास माळेगाव ग्रामपंचायतीने निष्ठावान गटाचे बळ वाढले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायती भाजपातील दुहेरी निष्ठेमुळे हातून गेल्या आहेत. हे वास्तव नाकारता येत नाही.