गटविकास अधिकार्‍यांअभावी बोदवड पंचायत समितीला ठोकले कुलूप

0

दोन तासात प्रभारी अधिकारी अवतरल्यानंतर उघडले कुलूप : भाजपाच्या सत्तेनंतरही अधिकारी मिळण्यासाठी संघर्ष

बोदवड (रवींद्र मराठे)- पंचायत समितीला आठ महिन्यापासून कायमस्वरूपी गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील विकासकामे खोळंबल्यानंतर असंख्य तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने सभापती व जिल्हा परीषद सदस्यांनी मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पंचायत समितीला कुलूप ठोकले तर त्याच्या दोन तासानंतर प्रभारी अधिकारी आल्यानंतर चार वाजेच्या सुमारास त्यांनी कुलूप उघडल्याने सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले.

प्रभारींचा वेळकाढूपणा
आठ महिन्यापासून बोदवड पंचायत समितीला प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून बी. आर. लोखंडे व श्रीकृष्णा इंगळे यांच्याकडे पदभार आहे. या अधिकार्‍यांनी नाईलाजास्तव वेळकाढूपणा केल्याचा आरोप असून ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांचा कुशल, अकुशल विहिरींचा निधी तसेच घरकुल शौचालयासारख्या वैयक्तिक लाभार्थी योजना अपूर्णच आहे. त्यांना अजून परिपूर्ण निधी मिळालेला नाही व ग्रामीण भागातील नागरिकांची विकासाची कामे खोळंबली आहेत. कार्यालयीन कर्मचार्‍यांवर वरिष्ठ अधिकार्‍यांचे अंकुश राहिलेले नाही. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना वेळोवेळी लेखी व तोंडी स्वरूपात कळविले तरीही वरिष्ठ अधिकार्‍यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.

पदाधिकार्‍यांनी ठोकले कुलूप
तालुक्यात 38 ग्रामपंचायत व 13 ग्रामसेवक आहेत. पंचायत समितीच्या एका शाखा अभियंत्यांच्या तक्रारीनुसार चौकशी झाली असून प्रस्तावही पाठविले पण, कारवाई होत नाही. जाणीवपूर्वक तालुक्यावर अन्याय करीत असल्याने आरोप करीत मंगळवारी सभापती गणेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य वर्षा पाटील, उपसभापती दीपाली राणे, सदस्य किशोर गायकवाड, भाजप तालुकाध्यक्ष भागवत टिकारे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामदास पाटील, समन्वय समिती अध्यक्ष अनिल पाटील, विजय चौधरी व भाजप कार्यकर्त्यांनी दुपारी दोनला पंचायत समिती कार्यालयाला कुलूप ठोकले. यावेळी कर्मचारी झाडाखाली सावलीत थांबून होते तर नऊ कर्मचारी कामानिमित्त बाहेर होते.

सभापतींच्या ईशार्‍यानंतर दोन तासात उघडले कुलूप
जिल्हा परीषदेचे मुख्य अधिकारी स्वत: बोदवडला येऊन कायमस्वरूपी गटविकास अधिकारी व ईतर अधिकारी देत नाहीत तोपर्यंत पंचायत समितीचे कुलूप उघडणार नाही, असा इशारा पंचायत समिती सभापती गणेश पाटील यांनी दिला होता मात्र अवघ्या दोन तासातच दुपारी चार वाजेच्या सुमारास प्रभारी अधिकार्‍यांनी कुलूप उघडल्यानंतर सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले.