गटारींमध्ये घाण टाकणार्‍या दुकानदारांना दंड

0

जळगाव। जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी आज मक्तेदारांच्या वार्डांमध्ये स्वच्छतेची पहाणी केली. या पहाणीत त्यांना महाबळ येथील साई प्लाझा या इमातरीत परमीट रूम असल्याचे व तेथे घाण असल्याची तक्रार नगरसेवक नितीन बरडे यांनी केली. यातक्रारीवरून साई प्लाझा बिल्डींगची परवानगी तपासून त्यात बिअरबारला परवानगी आहे का याची तपासणी करण्याचे आदेश दिलेत. तसेच या तपासणीत अपना इन अनाधिकृत आढळल्यास बंद करण्याचे आदेश श्री. निंबाळकर यांनी दिलेत.

वार्ड क्र. 28 मधील मक्तेदार गटारीतील कचरा उचलत नसल्याची तक्रार नागरिकांनी तसेच नगरसेवक रविंद्र पाटील व नगरसेविका उज्वला बेंडाळे यांनी केली. गटारीतील पाणी वाहत नसल्याची तक्रार रविंद्र पाटील यांनी केली असता मक्तेदाराच्या बिलात कपात करण्याचे आदेश दिलेत. मक्तदार वृदांवन महिला बचत गटाला कामात सुधारण्याचे आदेश दिले.

नगरसेवकांचा तक्रारींचा पाढा
नगरसेवक रविंद्र पाटील व नगरसेविका बेंडाळे यांनी रहिवाशी भागात प्रस्तावित क्वॉलीटी वाईन या दारू दुकानाचे सुरू असलेले बांधकाम दाखवित वाईन शॉप रहिवाशी भागात येऊ नये अशी मागणी केली. भूषण कॉलनीतील एमएच 19 कॅफेतील कचरा गटारीत पडल्याने गटार चोकअप झाल्याने कॅफे मालकाला दंड केला. रामदास कॉलनीतील क्राऊन बेकरी या दुकानाच्या जवळील गटारीत कचरा आढळल्याने दुकानमालकाला दंड करण्यात आला. यानंतर याच दुकानाच्या पुढील भागाची तपासणी केली असता तेथे पाण्याचे पाऊच, दारूच्या बाटल्या गटारीत आढळून आल्याने रामानंद पोलीस स्टेशनला तक्रार देण्याची सूचना यावेळी प्रभारी आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.