शिंदखेडा । शिंदखेडा येथील साई नगरातील रहिवाशांनी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अजित निकत यांची भेट घेऊन अनेक वर्षापासून रखडलेले गटार व रस्ता काँक्रेटीकरण करण्याचे काम लवकरात लवकर करण्यास यावे याबाबतचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, मागील पाच वर्षापासून परिसरात नागरिकांनी गटार व रस्ता काँक्रेटीकरण करण्यासंदर्भात अनेक वेळा लेखी तसेच तोंडी निवेदन ही दिले मात्र याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
20 ते 25 वर्षापूर्वी बांधण्यात आली होती भूमिगत गटार
लोकप्रतिनिधींना अनेक वेळा सांगितले पण त्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. येथे ग्रामपंचायत काळात 20 ते 25 वर्षापूर्वी भूमिगत गटार बांधण्यात आली आहे. ती गटार जमीन सपाटीपासून जवळ जवळ 10 फूट खोल आहे. गटारीत घाण व कचरा साचल्यामुळे बाथरूम बेसिन मधील सांडपाणी गटारीतून वाहत नाही. गटार खोल असल्यामुळे सफाई करणे शक्यच नाही. सांडपाणी हे गटारीतून परत बाथरूम येत आहे. तसेच गल्लीतून वाहत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून डास, मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे येथील नागरीक, लहान मुले विविध आजारांना बळी पडत आहेत. शहरात सर्वत्र रस्ता काँक्रेटीकरण करणाचे काम होत आहे.
आठ दिवसात काम सुरु न झाल्यास धरणे आंदोलनाचा इशारा
साई नगर येथील रस्ता व गटारीचे काम का होत नाही? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. मुख्याधिकारी यांनी येत्या आठ दिवसात गटार व रस्त्याचे काम मार्गी लागेल असे आश्वासन दिले. गटार व रस्त्याचे काम आठ दिवसात सुरू न झाल्यास नगरपंचायत येथे धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदना म्हटले आहे. निवेदनावर विनोद चौधरी, देविदास मराठे, गोविंद चौधरी, श्यामकांत पवार, देविदास चौधरी, राजेंद्र मराठे, प्रवीण मराठे, सोनू देसले, दर्शन पवार, डिगम्बर पाटील, अमृत मराठे, महेंद्र चौधरीसह आदींच्या सह्या आहेत.