पुणे : महापालिकेच्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा संभाजी ब्रिगेडने हटविल्यानंतर पुतळ्याचे राजकारण थोडे शांत होत नाही तोच, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी गडकरींऐवजी इतिहासकार बा. सी. बेंद्रे यांचा पुतळा संभाजी उद्यानात बसविण्याची सूचना करून या प्रकरणाला पुन्हा हवा दिली आहे. तर याप्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच निर्णय घेतील, असे सांगून महापौर मुक्ता टिळक यांनी वादाचे घोंगडे मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात मारले आहे. त्यामुळे शहर पातळीवरच्या या वादात थेट मुख्यमंत्र्यांनाच ओढण्याचे काम महापौरांनी केल्याने हा विषय सद्या शहरात चांगलाच चर्चेचा झाला आहे.
पुतळ्यांबाबत भाजपची भूमिका गुलदस्त्यात!
महापालिकेच्या छत्रपती संभाजी उद्यानात इतिहासकार बा. सी. बेंद्रे यांचा पुतळा बसवावा, अशी सूचना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी नुकतीच केली आहे. याच उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा उखडून टाकल्यानंतर नवा वाद निर्माण झाला. गडकरी यांचा पुतळा त्याच उद्यानात बसवावा अशी मागणी भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी महापौरांकडे यापूर्वीच केली होती. त्यावेळी महापौरांनी हा विषय पक्षाकडे सोपविल्याचे सांगितले. भाजपने अद्यापपर्यंत यावर भूमिका घेतलेली नाही. दरम्यान, संभाजी ब्रिगेडने या उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्याची मागणी केलेली आहे. यावर महापालिकेतील पदाधिकारी आणि पक्षनेते यांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे आणि यासाठी महापौरांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. परंतु, महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे विषय सोपविल्याचे जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात टोकाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
वादात मुख्यमंत्र्यांना का ओढत आहात?
राज्यात शेतकर्यांचा संप असो की अन्य विषय असो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच या सर्व समस्या आणि प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. अशात पुण्यातील संवेदनशील विषयातही फडणवीस यांना ओढणे कितपत योग्य आहे, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. पालकमंत्री गिरीश बापट पुण्यातीलच आहेत. महापालिकेच्या पदाधिकार्यांनी अशा संवेदनशीलप्रश्नी त्यांचा सल्ला घ्यावा, असेही भाजपच्या पदाधिकार्यांनी सूचित केले आहे. आमदार मेधा कुलकर्णी यांनी दादोजी कोंडदेव यांचा पुतळ्याच्या विषयाकडे महापौराना पत्र पाठवून लक्ष वेधले आहे. भाजपअंतर्गतच यावर एकमत होत नाही असे समजते.