पुणे । महाराष्ट्राची ओळखच मुळात गडकोटांचा प्रदेश अशी आहे. तरीही असे कितीतरी गडकोट आहेत जे अजून काळाच्या पडद्याआड विस्मृतीत गेले आहेत. असाच एक गड म्हणजे ‘ढवळगड’ ज्याची स्थाननिश्चिती करण्यात पुण्यातील गिर्यारोहकाला यश आले आहे. ओंकार ओक या गिर्यारोहकाने हा गड प्रकाशात आणून महाराष्ट्राच्या दुर्गवैभवात आणखी एका किल्ल्याची भर घातली आहे. या गडाबाबत ओंकार ओक म्हणाले, पुरंदर तालुक्यातील आंबळे गावाजवळ हा ढवळगड वसलेला आहे. या गडावर ढवळेश्वर सुप्रसिद्ध मंदिर आहे. तसेच तटबंदी, ढासळलेला दरवाजा, पाण्याच्या 4 टाक्या, चुन्याचा घाना, मेटाचे अवशेष शिल्लक आहेत. अशा या गडावर जाण्यासाठी दोन मार्ग असून त्यातला पहिला मार्ग सासवडहून चौफुला गावापासून वाघापूर ते आंबळे असा आहे. तर आंबळे गावातून गडाच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. दुसरा मार्ग पुणे-सोलापूर मार्गावरील उरुळीकांचन येथून असून डाळिंब गावातून ट्रेकिंग करत जावा लागत.
इतिहास संशोधक कृष्णाजी वामन पुरंदरे यांच्या किल्ले पुरंदर या अस्सल संदर्भपुस्तकात ढवळगडचा उल्लेख आलेला आहे. तसेच याचे संदर्भ पेशवे दप्तर, सभासद बखर, मराठी रियासातीमध्ये आधारतात. तर गॅझेटमध्ये याचा कुठेही उल्लेख आढळतात नाही. त्यामुळे हा आतापर्यंत प्रकाशात आला नव्हता. त्याचबरोबर येथील स्थानिकही याला फक्त प्रसिद्ध मंदिर म्हणूनच पाहत होते. त्यामुळे त्यांनी कधी याचा किल्ला किंवा गड या दृष्टीने याकडे पहिलेच नाही. अशा प्रकारे एक नवीन किल्ल्याचा शोध ओक व डॉ. जोशी यांनी घेतला असून त्याबाबत शनिवारी (19 मे) रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पाक्षिक सभेत त्यांनी यासंदर्भात संशोधन पेपर सादर केला.
ऐतिहासिक कागदपत्रात उल्लेख
या किल्ल्याच्या शोधाबाबत ओंकार ओक म्हणाले की, पक्षी निरीक्षणासाठी गेलो असता मला या ठिकाणी किल्ल्याचे अवशेष दिसले. त्यातून नावाचा संदर्भ लागत गेल्याने उत्सुकतेपोटी मी याचा खोलात जाऊन संशोधन करण्याचे ठरवले. पुण्यात आल्यावर डॉ. सचिन जोशी यांची भेट घेऊन याबद्दल सांगितले तेव्हा जोशी यांनीही या शोधमोहिमेत सहभागी होत पुरातत्वीय दृष्टिकोनातून ढवळगडाचा शोध घेण्याचे ठरवले. आम्ही दोघांनी पुन्हा एकदा या किल्ल्यास भेट देऊन व सर्व उपलब्ध अवशेषांची मोजमापे घेऊन तसेच त्यांची शास्त्रशुद्ध रेखाटने बनवली. किल्ल्यावरील ऐतिहासिक अवशेषांचा अभ्यास केला. त्यानंतर ऐतिहासिक कागदपत्रात उल्लेख असलेला किल्ला हाच ढवळगड असल्याचे सिद्ध होऊन त्याची स्थाननिश्चिती करण्यात आली.