मुंबई ।‘आला रे आला गणपती आला’च्या एकमुखी सुरात अंत्यंत जल्लोषात संपूर्ण राज्यभर महानगरांसह खेडोपाडी ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय अस्थापना, व्यापारी संकुले, उद्योजक, राजकीय, बॉलीवूड तसेच सामाजिक वर्तूळातील उच्चपदस्थांसह चाकरमानी, श्रमिक, कामगार आणि शेतकरी कुटुंबातील घरोघरी लाडक्या गणरायाच्या स्थापनेची लगबग दिसून आली. गणेशोत्सवाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून 125 व्या जयंती वर्षाचे निमित्त विविध सामाजिक विषयांना हात घालून प्रबोधन करण्यासाठी सरसावलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध शहरांमध्ये प्रमुख मार्गांवरुन ढोलताशांच्या गजरात गुलालासह फुलांच्या पाकळ्यांची उधळन करुन पारंपारीक तसेच थिमबेस्ड पोषाखात मिरवणुकीने ‘श्रीं’ची वाजत-गाजत प्रतिस्थापना केली.
यावेळी विविध चौकात लेझीम, चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करुन भाविकांची मने जिंकली. नुकत्याच झालेल्या समाधानकारक पावसाने आनंदित झालेल्या शेतकरी वर्गातही विशेषतः राज्यातील ग्रामीण भागात गणेशोत्सव मंडळांचा मोठा सहभाग दिसून आला. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बाजारपेठेत सकाळपासूनच गर्दीचा उच्चांक गाठला होता. उत्सवाच्या सजावटीसाठी लागणार्या विविध वस्तू, प्रसादाचे साहित्य, फुले हार, डेकोरेशन साहित्य, मोदक, वाजंत्री साहित्य आदी खरेदीसाठी तरुणाईसह महिला वर्ग दिसून येत होता. बालगोपालांचे हातात शाडू मातीच्या गणेशमूर्ती दिसून येत होत्या. यावर्षी पर्यावरण विषयक जागृती होवून कार्यशाळा झाल्याचा सकारात्मक परिणाम दिसून आल्याने शाडू मूर्तीबाबत भाविक आग्रही दिसले दिवसभर मंत्रोच्चाराच्या गजरात पारंपारिक
आरतीने राज्यभर गणरायाची विधिवत स्थापना झाली.