जळगाव। जिल्हा परिषदेच्या शाळांना शिक्षण विभागाकडून शालेय गणवेशाचे वाटप करण्यात येत होते. गणवेश वाटपात मोठा अपहार झाल्याचे उघड झाल्यानंतर शासनाने गणवेश न देता गणवेशाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांपर्यत लाभ पोहोचावा यासाठी शासनाने चांगला निर्णय घेतला आहे. मात्र जिल्ह्यातील 90 टक्के विद्यार्थ्यांना शाळा सुरु होऊन महिन्याभराहून अधिक कालावधी उलटला असतांनाही गणवेशाची रक्कम मिळालेली नसल्याने शासनाच्या निर्णयाला काळीमा फासला असल्याचा आरोप जिल्हा परिषद तथा स्थायी समिती सदस्य नानाभाऊ महाजन यांनी केला आहे. जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा गुरुवारी 20 रोजी साने गुरुजी सभागृहात घेण्यात आली. या वेळी त्यांनी गणवेशाचा मुद्दा मांडला. किती विद्यार्थ्यांच्या खात्यावर गणवेशाची रक्कम जमा करण्यात आली आहे याची माहिती त्यांनी मागितली असता शिक्षण विभागाच्या अधिकार्यांना माहिती देता आली नाही. खात्यावर रक्कम जमा करण्यात अनेक अडचणी येत असून पालकांची डोकेदुखी ठरत असल्याचे त्यांनी लक्षात आणुन दिले.
कृषीचा बजेट वाढवा
शेतकर्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन शेतकरी सक्षम करण्यासाठी शासनाने प्रशासनाने प्रयत्न करावा. इतर खात्यांमधुन रक्कम कपात करुन कृषी खात्याचा बजेट वाढवावा अशी मागणी स्थायी समिती सदस्य रावसाहेब पाटील यांनी केली. बजेट वाढल्यास शेतकर्यांना अधिक योनजा मिळू शकतात त्यादृष्टीने त्यांनी ही मागणी केली. कृषी पंप तसेच सिंचनासाठी शेतकर्यांना अधिक रक्क्म मिळावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
20 टक्के देयक थांबविणार
जिल्ह्याभरात जलसिंचनाचे 359 कामे करण्यात आली. त्यापैकी ’जलश्री’ या त्रयस्त समितीने प्रशासनाला दिलेल्या अहवालात तब्बल 55 कामांमध्ये त्रुट्या काढल्या. त्रुट्या आढळून आल्याने संबधीत ठेकदाराच्या 55 कामांची 20 टक्के बीलाची देयके अडविण्यात आली होती. 20 टक्के देयक थांबविण्याचे आदेश असतांनाही 5 कामांची देयक रक्कम ठेकेदाराला देण्यात आले असून उर्वरीत 50 कामांची रक्कम देण्याच्या तयारीत असल्याचे तक्रार स्थायी समिती सभेत नानाभाऊ महाजन यांनी केल्याने 20 टक्के देयक बिले थाबविण्याचे आदेश देण्यात आले आहे.
ग्रामसेवकांवर कारवाई
अमळनेर तालुक्यातील ढेकू खुर्द येथील ग्रामसेवकांनी दलीत वस्ती सुधार योजनोंतर्गत झालेल्या कामात 1.60 लाखाचा अपहार केल्याचे उघड झाल्यानंतर संबंधीत ग्रामसेवकांची चौकशी सुरु असून त्यांच्याकडून अपहाराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. एक चौकशी बाकी असून चौकशी अंती गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थायी सदस्य मधुकर काटे यांनी केली. आंचलवाडी, रणाई येथील ग्रामसेवकांची देखील चौकशी सुरु आहे. तसेच भडगाव येथील शिक्षक राकेश पाटील यांनी शालेय साहित्याची विक्री केली असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली.
बांधकाम अधिकार्याबद्दल तक्रारी
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात एखाद्या कामानिमित्त गेल्यास अधिकारी ठिकाणावर राहत नाही, बांधकाम विभागात अनागोंदी कारभार सुरु असून सदस्यांना वारंवार चकरा माराव्या लागतात अशी तक्रार शिवसेनेचे सदस्य, नानाभाऊ महाजन, प्रताप पाटील, रावसाहेब पाटील यांनी स्थायी सभेत केली. क्रिडा विभागाचे प्रश्न सभेत मांडण्यात येतात मात्र क्रिडा विभागाशी संबंधीत अधिकारी उपस्थित राहत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. तसेच अधिकार्यांकडून अपमानास्पद वागणुक मिळत असल्याची तक्रार सदस्यांनी केली.