बोदवड । विद्यार्थ्यांनी, संशोधकांनी विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, संगणकशास्त्र आदी विषयांना गणिताची जोड दिल्यास उच्च दर्जाचे संशोधननिर्मिती होवू शकते, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्राचार्य डॉ. के.बी. पाटील यांनी केले. बोदवड महाविद्यालयात रोल ऑफ मॅथेमॅटिक्स इन सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी या विषयावर गणिताची एकदिवसीय राष्ट्रीय परिषद घेण्यात आली. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्था विश्वस्त व भारतीय जैन संघटनेचे माजी उपाध्यक्ष अॅड. प्रकाशचंद सुराणा होते. प्रमुख अतिथी म्हणून चेअरमन मिठुलाल अग्रवाल, सचिव विकास कोटेचा, नागपूर विद्यापीठाचे गणित विभागप्रमुख प्रा.डॉ. जी.एस. खडेकर, उमवि बीसीयुडी संचालक डॉ. पी.पी. माहुलीकर उपस्थित होते.
गणित संशोधनाचे महत्व वाढणार
डॉ. के.बी. पाटील बीजव्याख्यानात म्हणाले की, बोदवडसारख्या लहान गावात लहान युनिट असलेल्या महाविद्यालयात राष्ट्रीय गणित परिषदेचे आयोजन करुन गणित संशोधनाला चालना देणारा उपक्रम हाती घेण्याचे धाडस केले असल्याचे कौतुक केले. भविष्यात गणित संशोधनाचे महत्व दिवसेंदिवस वाढत जाणार आहे.
गणितात रोजगाराची संधी उपलब्ध होणार
सध्याच्या माहिती युगात दररोज प्रचंड माहिती जमा होत आहे. या माहितीच्या पर्वताचे आकलन सारांश करण्यासाठी गणिताशिवाय काहीही पर्याय नसल्यामुळे गणित विषयाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे गणितात रोजगाराची प्रचंड संधी उपलब्ध होणार आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देश आर्थिक मंदीच्या संकटातून गणित संशोधनातून कशाप्रकारे बाहेर आला याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा.डॉ. जी.एस. खडेकर यांनी गणितातील विविध गंमती सांगून सहज सोप्या भाषेत विषयाची व्याप्ती विषद केली. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. ए.पी. राजपूत, सुत्रसंचालन डॉ. गीता पाटील, डॉ. रुपाली तायडे तर आभार प्रा. कांचन दमाडे, प्रा. एन.पी. सावदेकर यांनी मानले.